16 November 2019

News Flash

लोकसभेचा उत्साह कायम ठेवून विधानसभेसाठी तयारीला लागा

दानवे यांचे आवाहन

दानवे यांचे आवाहन

भारतीय जनता पक्ष देशभर वाढतो आहे. भाजपचे पूर्वी लोकसभेत दोनच खासदार होते, आता ३०३ झाले आहेत. लोकसभेत घवघवीत यश मिळाले. हाच उत्साह कायम ठेवून आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागा. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जेवढे कष्ट घेतले, तितकीच मेहनत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा व्हावा यासाठी घ्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सोमवारी पिंपरीत बोलताना केले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मोरवाडी येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अत्रे रंगमंदिरात आयोजित भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, योगेश टिळेकर, महापौर राहुल जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

दानवे म्हणाले,की लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे. राज्यात ४८ पैकी ४२ जागा युतीला मिळाल्या. आता विधानसभेसाठी शिवसेनेशी युती कायम राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील २२८ विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळाले आहे. आता विधानसभाजिंकणे हेच प्रथम कर्तव्य मानून तयारीला लागा. जनतेने मोदींना आणि भाजप सरकारच्या कामगिरीला पसंती दिली आहे. विरोधी पक्ष नाउमेद झाले आहेत.

पवारांना घरचा रस्ता दाखवणे ही काळाची गरज – बापट

पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांची गिरीश बापट यांनी भाषणात फिरकी घेतली. महाराष्ट्रात सापडणार नाहीत, इतके मान्यवर या शहरात आहेत. मला सगळं समजण्यासाठी साडेचार वर्षे लागली, असे ते म्हणाले. राजकारणात तडजोड करावीच लागते. त्यामुळे अनेकदा नाराजी उद्भवते. मात्र, लांब पल्ला गाठायचा असल्यास हे करावे लागते. लोकसभेत दणका देऊन पवारांना घरचा रस्ता दाखवणे ही काळाची गरज होती. ते करून पिंपरी-चिंचवडकरांनी इतिहास घडवला असेही बापट म्हणाले.

First Published on June 11, 2019 3:08 am

Web Title: raosaheb danve election 2019 2