बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील काही जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे एकूण जागांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

राज्यभरातील लाखो उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, एससीबीसी आरक्षण, खुल्या गटातील आर्थिकदृष्टय़ा मागासांसाठीचे १० टक्के, ओबीसींसाठीचे १६ टक्के आरक्षणाच्या तांत्रिक मुद्दय़ांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच भरती प्रक्रियेविरोधात काहींनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने शिक्षक भरती लांबणीवर पडण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र खुल्या, एससीबीसी आरक्षणाबाबतच्या तांत्रिक अडचणींवर राज्य सरकारने मार्ग काढल्यामुळे भरती प्रक्रियेतील तांत्रिक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील काही जागा जिल्हा परिषदनिहाय भरल्या जातील. खुल्या आणि अन्य गटातील जागा उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी १०० टक्के, तर काही ठिकाणी ५० टक्के जागा भरल्या जातील, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

खासगी संस्था कमी

राज्यभरातील खासगी संस्थांचा पवित्र संकेतस्थळाद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यास विरोध होता. त्यामुळे एकूण संस्थांच्या तुलनेत कमी संस्था या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. कमी जागा उपलब्ध होण्याचे तेही एक कारण आहे. आताच्या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या संस्था पुढच्या टप्प्यातील प्रक्रियेत सहभागी होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अडचणीची ठरू शकणाऱ्या तांत्रिक मुद्दय़ांबाबत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तांत्रिक कामे पूर्ण करून शक्य तितक्या लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्याला प्राधान्य आहे.

– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त