कागदावरून प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’चा दर्जा मिळालेली जिओ इन्स्टिटय़ूट आहे तरी कुठे, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात विचारला जात आहे. ही संस्था पुण्यात उभारली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबत पुण्यातील शिक्षण क्षेत्रात संभ्रम आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांना इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्सचा दर्जा जाहीर केला. सोबतच खासगी क्षेत्रातील बिट्स पिलानी, मणिपाल अ‍ॅकॅडमी आणि रिलायन्सच्या जिओ इन्स्टिटय़ूटला ग्रीनफिल्ड विभागात हा दर्जा देण्यात आला. ही संस्था सुरू होण्यापूर्वीच एमिनन्सचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळाल्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘रिलायन्सने समितीला दिलेल्या प्रस्तावामध्ये जिओ इन्स्टिटय़ूट पुण्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी साडे नऊ हजार कोटी रुपये खर्च करून ‘फुल्ली रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी सिटी’ उभारली जाणार आहे,’ असे आयएएनएस या वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.

पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना या संस्थेविषयी काहीच कल्पना नाही. जिओ इन्स्टिटय़ूट पुण्यात उभारली जाण्याची चर्चा असली, तरी त्याविषयी काहीच माहिती नाही. ही संस्था कुठे उभारणार, त्या संस्थेत कोणते अभ्यासक्रम असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, संस्था प्रत्यक्षात येण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा दर्जा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’च्या स्पर्धेत होते. मात्र, या वेळी केंद्रीय संस्थांना प्राधान्य देण्यात आल्याने विद्यापीठाला हा दर्जा मिळू शकला नाही. विद्यापीठाचा ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’साठी विचार होईल अशी अपेक्षा होती. मात्र, निवड न झाल्याने दुख वाटण्याचे कारण नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालय योजनेच्या पुढील टप्प्यात विद्यापीठाचा नक्कीच विचार करेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली.