केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतुकीतील संघटनांनी पुकारलेला बंद गुरुवारी सकाळीच मागे घेतल्याने नागरिकांची गैरसोय टळली. पीएमपी व एसटी संघटनांनी बंदमध्ये सुरुवातीपासूनच सहभाग न घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्यानंतर सकाळी रिक्षा व टॅक्सी सेवा संघटनांनीही बंद मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत झाली.
वाहतूकदारांनी बंद जाहीर केल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संघटनांची बैठक बोलविली. नवीन कायदा करताना सार्वजनिक वाहनांचे हित जपले जाईल व रिक्षांच्या प्रश्नांबाबत येत्या १५ दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन रावते यांनी दिल्यामुळे सकाळीच बंद मागे घेत असल्याचे संघटनांनी जाहीर केले. गुरुवारी सकाळपासून बंद सुरू होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पीएमपी व एसटीच्या संघटनांनी सुरुवातीपासून बंदमध्ये सहभाग न घेतल्याने सकाळी बंदचा परिणाम जाणवला नाही. काही भागांत रिक्षा बंद होत्या, मात्र त्या ठिकाणी नागरिकांनी पीएमपी बसचा आधार घेतला. त्यानंतर सकाळी ११ वाजता रिक्षा संघटनांनीही बंद मागे घेतल्याने सार्वजनिक वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, रिक्षा पंचायतीच्या वतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. पंचायतीचे निमंत्रक व ऑटो रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेवृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवासी तहसीलदारांना रिक्षा चालकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.