पुणे महानरपालिकेतील विविध विभागामार्फत स्मार्ट संस्थेच्या वतीने महिला कामगार काम करतात. मात्र या महिलांना अचानक कामावरुन कमी कऱण्यात आले असून २३० हून अधिक महिलांचा रोजगार बंद झाला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी आज महापालिकेत आंदोलन केले. विशेष म्हणजे हे आंदोलन त्यांनी शोले स्टाईलने करत पुणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये थांबून केले. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारु अशी धमकीही त्यांनी यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिली.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारती मधील विविध विभागामध्ये स्मार्ट या संस्थेमार्फत १० वर्षापासून ठेकेदार पध्द्तीवर महिला सेविका काम करीत होत्या. मात्र मागील वर्षी या सेविकाचा करार वाढवण्यात आला नाही. त्यामुळे रोजगार नसल्याने या महिलांचे उत्पन्न अचानक बंद झाले. या महिला सेविकांना कामावर घेण्याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी निवेदन देण्यात आले. मात्र याची दखल न घेतल्याने आज अखेर मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील आणि युगंधरा चाकणकर यांनी महापालिकेच्या इमारतीवर जाऊन शोले स्टाईलने आंदोलन केल्याचे स्पष्ट केले.

महिलांना कामावर घेण्याची हमी दिल्यावरच आम्ही खाली येऊ असे या दोघीही सांगत होत्या. त्यांना खाली उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अग्निशमन दलाची गाडीही बोलावली. अखेर महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेत येत्या २५ तारखेपर्यँत याबाबत निर्णय घेऊ असे आश्वसन दिल्यावर रुपाली पाटील खाली उतरल्या. आता महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रकरणाबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.