मंत्रालयात करण्यात आलेल्या आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, याबाबतची खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातही संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर जाळी बसविण्यात आली असून ए आणि बी विंग येथेही जाळ्या बसविण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येत आहे.

मंत्रालयात हर्षल रावते नावाच्या व्यक्तीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इमारतीच्या मध्यभागात जाळी बसविण्यात आली आहे. दरम्यान, नव्या जिल्हाधिकारी इमारतीचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नवी इमारत अत्यंत सुसज्ज असून प्रत्येक मजल्यावर लोखंडी जाळीच्या चौकटी (ग्रील) आहेत. पाचव्या मजल्यावरील लोखंडी जाळीच्या चौकटी उंचीने लहान असल्याने त्यावरून पलीकडे कोणीही सहजपणे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पाचव्या मजल्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची कार्यालये आहेत. विविध विषयांवरील सुनावण्या या तीनही अधिकाऱ्यांकडे होत असतात. सुनावण्यांमधील अनेक विषय संवेदनशील, वर्षांनुवर्षे प्रलंबित असतात. तसेच जिल्ह्य़ात मेट्रो, वर्तुळाकार रस्ता, आंतरराष्ट्रीय विमानतळ असे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. तर, भामा आसखेडसारख्या अनेक प्रकल्पांमधील बाधितांचे पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. तसेच मागील आठवडय़ात एका नागरिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला होता.

या सर्व पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इमारतीचे वास्तुविशारद यांच्या संरक्षक जाळी बसविण्याबाबत तीन बैठका पार पडल्या. जाळ्या बसविल्यास इमारतीचे सौंदर्य धोक्यात येईल, असा अभिप्राय वास्तुविशारदांनी दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याने संरक्षक जाळ्या बसविण्याबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आदेश दिले होते.

नव्या जिल्हाधिकारी इमारतीमध्ये ए विंग आणि बी विंग असे दोन भाग करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग कार्यरत आहेत. या दोन्ही विंगमध्ये उंच ठिकाणी आणि पाचव्या मजल्यावर जाळ्या बसविण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार बाविस्कर यांनी दिली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने जाळ्या

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून सामान्य नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जाळी बसविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नेमक्या कोणत्या ठिकाणी जाळी बसविणे योग्य ठरेल, याबाबत इमारतीची पाहणी करण्यात आली असून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्याला मान्यता प्राप्त झाल्यामुळे मंगळवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मंत्रालयात बसविण्यात आलेल्या जाळीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाळी बसविण्यात येत आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.