गायन, वादन आणि नृत्य अशा त्रिवेणी संगीताची अनुभूती देणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या प्रांतामध्ये जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’स गुरुवारपासून (१० डिसेंबर) प्रारंभ होत आहे. बुजुर्ग कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचा आविष्कार असलेल्या या महोत्सवात रविवापर्यंत (१३ डिसेंबर) चार दिवसांचा स्वरयज्ञ कानसेन रसिकांना अनुभवावयास मिळणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये शुभकार्याचा प्रारंभ मंगल वाद्याच्या वादनाने करण्याची प्रथा आहे. त्यानुसार महोत्सवामध्ये पदार्पण करणारी युवा कलाकार नम्रता गायकवाड हिच्या शहनाईवादनाने यंदाच्या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर आयोजित या महोत्सवाचे यंदा ६३ वे वर्ष आहे. महोत्सवासाठी ९० हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गेल्या वर्षी आलेल्या पावसाचा अनुभव ध्यानात घेऊन यावर्षी संपूर्ण मंडप पत्र्यांनी आच्छादित करण्यात आला आहे. दरवर्षी १२ हजारांहून अधिक रसिक या महोत्सवास आवर्जून उपस्थित असतात. स्वरमंचावरून सादर होणारा कलाविष्कार आणि कलाकारांच्या भावमुद्रा रसिकांना सुस्पष्टपणे दिसाव्यात यासाठी दोन मोठय़ा आकाराचे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मंडपामध्ये काही ठिकाणी क्लोजसर्किट टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रसिकांसाठी सोफा, खुर्ची आणि भारतीय बैठक अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. रसिकांनी आपली वाहने रानडे बालक मंदिर येथे लावावीत, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
महोत्सवाच्यानिमित्ताने रसिकांची संगीतविषयक जाण वाढविण्याच्या उद्देशातून ‘अंतरंग’ आणि ‘षड्ज’ हे उपक्रम आयोजित केले जातात. कलाकाराशी संवाद असे स्वरूप असलेल्या ‘अंतरंग’मधून त्या कलाकाराची जडणघडण आणि त्याचे सांगीतिक विचार रसिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘षड्ज’मध्ये गुरुवारी मधुरा जसराज दिग्दर्शित ‘संगीत मरतड जसराज’ हा लघुपट सकाळी दहा वाजता दाखविला जाणार आहे. त्यानंतर ‘अंतरंग’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांची प्रकट मुलाखत होणार आहे. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.

महोत्सवात आज (दुपारी ३ वाजता)
– नम्रता गायकवाड (शहनाई)
– सावनी कुलकर्णी- शिल्पा पुणतांबेकर (सहगायन)
– रुपक कुलकर्णी- प्रवीण शेवलीकर (बासरी-व्हायोलिन)
– पं. राजन-साजन मिश्रा (गायन)