अभिजात संगीताच्या प्रांतामध्ये देश-परदेशात नावाजलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला. महोत्सव आता जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पुन्हा घेण्यात येणार असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे संयोजकांनी जाहीर केले.
चार दिवसांच्या स्वरोत्सवाची पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास गुरुवारी पारंपरिक थाटामध्ये प्रारंभ झाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी आलेल्या अवकाळी पावसामुळे महोत्सवातील उर्वरित कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. हा महोत्सव तात्पुरता स्थगित झाल्यामुळे रसिक श्रोते हळहळले. पावसाने जोर धरल्यानंतरही रसिकांनी शांतपणाने सहकार्य केल्याबद्दल आर्य संगीत प्रसारक मंडळाने रसिकांना धन्यवाद देत त्यांचे जाहीर आभार मानले. महोत्सवाचा सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून शक्यतो हेच कलाकार पुन्हा असावेत या दृष्टीने मंडळातर्फे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
कडक उन्हामुळे घामाघूम होत असतानाच दुपारी ढग दाटून आले आणि साडेबाराच्या सुमारास जोरदार पावसाची सर आली. अर्धा तास पाऊस पडल्यानंतर जेथे हा महोत्सव होतो, त्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले. कलाविष्कार सादर केला जातो त्या स्वरमंचावर पाणी पडल्याने पूर्ण ओल पसरली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सफाई करून पुन्हा स्वरमंच सज्ज केला. त्याचप्रमाणे मैदानामध्ये भारतीय बैठक असलेल्या श्रोत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ४० हजार चौरस फुटांचे प्लास्टिक अंथरण्यात आले.
ही सारी तयारी पूर्ण होईपर्यंत महोत्सवाच्या शुक्रवारच्या सत्राची सुरुवात चारऐवजी पाच वाजता करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे निवेदक आनंद देशमुख यांनी सांगितले. श्रीनिवास जोशी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, एकीकडे महोत्सव रात्री दहा वाजता संपवावा लागतो. तर, दुसरीकडे कलाकारांना आपला कलाविष्कार सादर करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे आधी पाहुण्या कलाकारांना संधी मिळावी यासाठी आमचे गुरुबंधू आणि मंडळाचे कार्यकर्ते आनंद भाटे हे रविवारी गायन सादर करतील.
केव्हा पाच वाजतात आणि स्वरानंदामध्ये भिजून जातो याच्या प्रतीक्षेत रसिक असतानाच सव्वाचारच्या सुमारास पुन्हा पावसाची जोरदार सर आली. त्यामुळे भारतीय बैठक असलेल्या ठिकाणी अंथरण्यात आलेले प्लास्टिक काढून घेण्यात आले. पावणेपाचच्या सुमारास श्रीनिवास जोशी यांनी स्वरमंचावर येत हा महोत्सव तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे जाहीर केले. संगीत श्रवणाचा आनंद घेता येत नसल्याने हिरमोड झालेल्या श्रोत्यांनी जड अंत:करणाने रमणबाग प्रशालेचे मैदान सोडले.
…………………..