कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून काळय़ा फिती लावून निषेध; ५ जुलैपर्यंत निषेध सप्ताह

बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास ‘युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स’ने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून काळय़ा फिती लावून शनिवारी निषेध व्यक्त करण्यात आला. गुरुवापर्यंत (५ जुलै) निषेध सप्ताह पाळला जाणार आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या कर्जातील कथित गैरव्यवहारप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयाविरुद्ध बँकेतील सर्व कामगार संघटनांनी ‘युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स’च्या छताखाली एकत्र येत संघर्षांचा पवित्रा पुकारला आहे. बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळय़ा फिती लावून शनिवारी निषेध व्यक्त केला. शिवाजीनगर येथील लोकमंङ्गल या बँकेच्या मुख्यालय येथे झालेल्या द्वारसभेत गुरुवापर्यंत (५ जुलै) निषेध सप्ताह पाळण्याचा निर्धार करण्यात आला.

वरिष्ठ व्यवस्थापनावरील अन्यायकारक कारवाई विरुद्ध बँकेतील सफाई कर्मचारी ते महाव्यवस्थापक पदावरील सर्वानी एकत्र येऊन पाठिंबा देण्याची बँकिंग उद्योगातील ही अपवादात्मक घटना म्हणता येईल. युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्समधील सहभागी संघटनांच्या पदाधिका?ऱ्यांच्या शिष्टमंडळाने बँकेचे कार्यकारी संचालक आणि सध्या व्यवस्थापकीय संचालक हा पदभार असलेले आलेख राऊत यांची भेट घेतली. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ही राज्याची अर्थ संदर्भातील जीवनरेषा आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळय़ाची बँक ही जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न सुरू असून, बँकेची मूळ प्रतिमा जपण्यासाठी सर्व कर्मचारी एकदिलाने प्रयत्न करतील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत सर्व संघटना व्यवस्थापनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळाने दिली. मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास भावी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी (६ जुलै) बैठक घेण्यात येणार आहे.

मराठे आणि गुप्ता उपस्थित

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शुक्रवारी (२९ जून) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये रवींद्र मराठे आणि राजेंद्र गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यानंतर मराठे आणि गुप्ता हे दोघेही शनिवारी बँकेत उपस्थित होते. बँकेचे माजी अध्यक्ष सुशील मुहनोत यांनीदेखील लोकमंङ्गल या बँकेच्या मुख्यालयाला भेट दिली.

बँकेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने गेल्याच महिन्यात गौरव केलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप विराज टिकेकर यांनी केला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून २९ जून या दिवसाची नोंद केली जाईल, असे शैलेश टिळेकर यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आपण संयम बाळगला. आता ५ जुलैपर्यंत निषेध सप्ताह पाळला जाणार असून ६ जुलै रोजी भावी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे राजीव ताम्हणे यांनी सांगितले. वसंत पोंक्षे यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत द्वारसभेच्या ठिकाणी संचालक मंडळाच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने करण्यात आली.