राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम

नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले असून, अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात ते दाखल झाले आहेत. सध्या राज्यात उन्हाचा चटका असतानाच ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम असून, विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्य सध्या उन्हाने होरपळून निघत आहे. बहुतांश भागातील जलसाठे कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत मोसमी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पोषक स्थितीमुळे नियोजित वेळेपेक्षा काही दिवस आधीच म्हणजे १८ मे रोजी मोसमी वारे अंदमानात दाखल झाले. त्यानंतर त्यांची अरबी समुद्रात प्रगती सुरू आहे. मोसमी वाऱ्यांनी ३० मे रोजी अंदमान बेटांचा संपूर्ण परिसर व्यापला. त्यानंतर ते अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागात दाखल झाले. सोमवारी (३ जून) अरबी समुद्राचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागरापर्यंत मोसमी वाऱ्यांची प्रगती केली. ६ जूनपर्यंत मोसमी वारे केरळात दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोसमी पावसापूर्वीच्या पावसाने सध्या ओढ दिली असली, तरी पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ, मराठवाडय़ात उष्णतेची लाट आहे. सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथील तापमानही ४५ ते ४६ अंशांवर आहे. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी ४२ ते ४४ अंशांदरम्यान तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, मालेगाव, सोलापूर आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर आहे. कोकण विभागात मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरीतील तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे.

पावसाची शक्यता कुठे?

राज्यात ठिकठिकाणी तीन ते चार दिवस पूर्वमोसमी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्वमोसमी पाऊस झाल्यास तीव्र उष्म्यापासून काही प्रमाणात तरी सुटका मिळू शकणार आहे.