पुणे : वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे अशा कार्यकर्त्यांसह अनेक व्यक्ती त्यांच्या शब्दांमुळे स्थानबद्ध आहेत. अर्थात त्यांच्यापैकी एकावरही मारहाण केल्याचा, बंदूक बाळगल्याचा आरोप नाही. सत्ता आणि अधिकारापुढे शब्द आणि कल्पना हतबल होत असल्याचे चित्र आहे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी शनिवारी मांडले.

सिम्बायोसिसतर्फे आयोजित ऑनलाइन साहित्य महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात थरूर बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.

थरूर म्हणाले, की तलवारीपेक्षा लेखणी जास्त ताकदवान असते हे मी शाळेत असताना शिकलो होतो. मात्र आजच्या राजकारणाची स्थिती पाहता मला ते पटत नाही.

सत्ता आणि अधिकार काही काळ शब्दांना दाबून टाकू शकतात. वरवरा राव, वेरनॉन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे हे त्यांच्या शब्दांमुळे स्थानबद्ध आहेत. त्यांच्यापैकी कोणीही दगडफेक करणे, कोणाला मारहाण करणे, बंदूक बाळगणे असे प्रकार केलेले नाहीत. सध्याच्या सरकारला लेखणी बांधली गेली असेल, तर कसे व्हायचे, असा प्रश्नही थरूर यांनी उपस्थित केला.