30 March 2020

News Flash

सेवाध्यास : आश्वासक ‘स्पर्श’

आई-वडिलांना बिलगून बसणारी मुले आता घरभर फिरतात, भिंतीचा आधार घेऊन एकटी चालतात.

श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

मुले आणि पालकांमध्ये असलेल्या भावनिक नात्याची वीण उसविण्यामागे एक मह्त्त्वाचे कारण म्हणजे बहुविकलांगत्व. मतिमंद, दृष्टिबाधित, मूकबधिर मुले ज्या आईच्या पोटी जन्माला येतात, ती मुले त्या कुटुंबाला तर नको नकोशी होतातच, पण ज्या मातेने त्या मुलाला जन्म दिला, तिला देखील त्या मुलाचे ओझे वाटू लागते. असे मूल आपल्याला आहे, याचा स्वीकार करणे त्या आईसह कुटुंबाला देखील अवघड जाते. तर कधी-कधी त्या व्यंगासह जन्माला आलेल्या मुलाला जन्म देण्यास केवळ आईच जबाबदार आहे असे मानले जाते. पण या मुलांमधील व्यंग शोधून काढत त्यावर मात करण्यासाठी त्या बालकासह, पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे तसेच बालकावर उपचार करण्याचे कार्य ‘स्पर्श’ या दृष्टिबाधित आणि बहिऱ्या मुलांसाठीच्या उपचार केंद्रामार्फत सुरू आहे.

आपल्याला भूक लागली आहे, हेही सांगू न शकणारी बहुविकलांग बालके. ऐकू न येणे, त्याबरोबरच बोलता न येणे आणि त्याशिवाय दृष्टिबाधित असल्यामुळे आपल्या बाजूला काय सुरू आहे, याचे भानच आपल्या चिमुरडय़ांना नसल्यामुळे एका बाजूला पालक चिंतेत. तर दुसऱ्या बाजूला पोषण वगैरै गोष्टींपासून दूर असलेल्या या बालकांचे संगोपन करण्यात अनंत अडचणी. या सगळ्या अडचणींमध्ये भर ती अशिक्षितपणा आणि आर्थिक दौर्बल्याची देखील. जन्मत:च अंधत्व आलेली बालके, जी केवळ आणि केवळ आईवडिलांचाच स्पर्श ओळखतात, त्यांनाही ऐकू येण्याबरोबरच बोलण्याची अडचण येते. सतत पालकांना बिलगून असणाऱ्या या मुलांच्या बाबतीत पालकांना दीड वित पोटासाठी का होईना काहीतरी हात-पाय तर हालवले पाहिजेतच ना !  या आणि अशा अनेक पालकांबरोबरच मुलांना आश्वासक स्पर्श देणारा हा उपक्रम आहे, ‘द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन’चा.

विविध समस्यांनी ग्रस्त अशा या अनेक मुलांमध्ये काही वर्षांच्या परिश्रमानंतर पडलेला फरक सहज लक्षात येतो. भूक लागल्यानंतर ही मुले जवळ असलेला चमचा आईला दाखवतात किंवा पाणी पाहिजे असेल तर ग्लास हातात घेतात, या मुलांना नक्की काय पाहिजे ते आईला आणि घरातल्या लोकांना आता लगेच समजते. आई-वडिलांना बिलगून बसणारी मुले आता घरभर फिरतात, भिंतीचा आधार घेऊन एकटी चालतात.

मुलांमधला हा सकारात्मक बदल होण्यास कारणीभूत ठरला तो स्पर्श हा उपक्रम आणि या उपक्रमांतर्गत कार्यरत असणारे कार्यकर्ते. ‘स्पर्श’ च्या केंद्रात दाखल झालेल्या मुलांना आणि त्यांच्यासोबत पालकांना सांकेतिक भाषा आणि रोजच्या जगण्यात बहुविकलांग मुलांशी संवाद कशाप्रकारे साधायचा हे शिकवले जाते. जे या केंद्रात शिकवले, त्याचा सराव घरी केल्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसतो आहे आणि त्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधान विलसू लागले आहे.

पुणे शहर आणि उपनगरात राहणाऱ्या वय वष्रे एक ते पंधरा या वयोगटामधील बहुविकलांग मुलांसाठी हे केंद्र काम करते. समाजातील बहुविकलांग घटकांची गरज लक्षात घेऊन  ‘सेन्स इंटरनॅशनल इंडिया’ यांच्या सोबतीने बहुविकलांग मुलांसाठी हा पुनर्वसन प्रकल्प सुरू केला. २०१५ पासून सुरू झालेल्या या केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व उपचार तसेच सोयीसुविधा विनामूल्य आहेत.

विशेष प्रशिक्षकाच्या माध्यमातून त्या मुलांना केंद्रात प्रशिक्षण देण्यात येते. एका वेळी विशेष प्रशिक्षकद्वारे एकाच मुलाला सुमारे दोन तास प्रशिक्षण दिले जाते. अशा बहुविकलांग मुलांना कशापद्धतीने सांभाळायचे याचे मार्गदर्शनही करण्यात येते. या  प्रकल्पातंर्गत भौतिक चिकित्सा (Physiotherapy), वाचा उपचारपद्धती (Speech Therapy), संवेदी एकत्रीकरण (Sensory Integration), संवेदी प्रशिक्षण (Sensory Training) या विविध उपचार पद्धतीमार्फत बहुविकलांग मुलांच्या सर्वागीण विकासावर काम केले जाते.  त्यांच्या गरजेनुसार कराव्या लागणाऱ्या वैद्यकीय तपासण्या, औषधे यासाठी नियमानुसार आíथक मदतसुद्धा केंद्राद्वारे दिली जाते. या उपचाराच्या सर्व नोंदी आणि मुलाच्या प्रगतीचा अहवाल तयार केला जातो. त्याच्या आधारे मुलांना प्रशिक्षण दिले जाते.

नेहमी होणाऱ्या प्रशिक्षण, समुपदेशाबरोबरच मुलांचे वाढदिवस, मुले व पालक यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, पालकांची सभा, सहल इत्यादी विविध उपक्रम केद्रामध्ये राबविले जातात. बहिरेपणाबरोबरच अंधत्व आलेल्या मुलांना त्यांच्या शाळेत जाऊन स्पर्श केंद्रामार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाते.

काही कारणास्तव जी बहुविकलांग मुले केंद्रात येऊ शकत नाही, अशा मुलांची माहिती केंद्राचे कार्यकर्ते घेतात आणि मुलांच्या घरी जाऊन पालकांची आणि घरातल्या इतर लोकांची भेट घेऊन त्यांना केंद्राची माहिती देत त्यांना केंद्रात येण्याविषयी सुचवितात. जर त्यांना केंद्रात येणे अगदीच अशक्य असेल, तर गरजेनुसार विशेष शिक्षक त्या मुलांच्या घरी जाऊन मुलांना प्रशिक्षण देतात.

‘द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन’ ही सामाजिक संस्था गेली साठ वर्ष दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबवित आहेत. पुणे शहरात डोळ्यावरील अद्ययावत उपचारांसाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, दृष्टिबाधित तरुणांसाठी रामटेकडी, हडपसर येथे तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आणि दृष्टिबाधित वृद्ध, निराधार महिलांसाठी सिंहगड रोडवरील धायरीजवळ शिर्डी साईबाबा अंध महिलवृद्धाश्रम आदी प्रकल्प संस्थेमार्फत राबविले जातात.

तुमच्या अवतीभोवती जर बहुविकलांग मुले असतील आणि त्यांना उपचार देणे पालकांना आर्थिकदृष्टय़ा शक्य नसेल, तर या केंद्राबाबत तुम्ही अशा गरजू पालकांना सांगू शकता किंवा बहुविकलंगत्व असेलले एक ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांचे पालकही थेट स्पर्श केंद्रात संपर्क करू शकतात. रामटेकडी, हडपसर येथील या केंद्रातील सोईसुविधांची अधिक माहिती घेण्यासाठी ९८१९९१५०७० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 4:50 am

Web Title: sparsh ngo working for underprivileged children zws 70
Next Stories
1 दस्त नोंदणीची कागदपत्रे आता घरबसल्या ‘अपलोड’
2 पुण्यातील जुना बाजार महिनाभर भरविता येणार नाही
3 ‘मी जर दुसर्‍या पक्षात गेलो असतो, तर काहीही मिळालं नसतं’
Just Now!
X