करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विक्री करारनामा (अ‍ॅग्रीमेंट ऑफ सेल) व अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स) प्रकारच्याच दस्तांवर डिसेंबपर्यंत तीन टक्के , तर जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन टक्के  मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे.

तारण आणि भाडेकरार अशा व इतर प्रकारच्या दस्तांना पूर्वीप्रमाणे पाच टक्के  मुद्रांक शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे सरसकट सर्व प्रकारच्या दस्तांवर तीन टक्के  सवलत लागू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेली सवलत विक्री करारनामा व अभिहस्तांतरण पत्राला दिल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश प्रसृतही करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त असणाऱ्या दस्तांवर पूर्वीप्रमाणेच पाच टक्के  मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात येत आहे. मात्र, ही बाब नागरिकांसह वकिलांनाही माहीत नसल्याने कोणत्या दस्तांवर सवलत लागू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, दुय्यम निबंधक कार्यालयात अवधूत लॉ फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. चंदन फरताळे यांनी चौकशी केल्यानंतर विक्री करारनामा व अभिहस्तांतरण पत्र वगळता उर्वरित दस्तांवर पाच टक्के  मुद्रांक शुल्क आकरण्याबाबत अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे राज्य शासनाचे धोरण आणि मुद्रांक विभाग प्रशासनाची भूमिका विरोधाभासी आहे, अशी तक्रार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अवधूत लॉ फाउंडेशनच्या वतीने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अचानक डीड ऑफ असाइन्मेंट, डीड ऑफ अपार्टमेंट अशा शीर्षक असलेल्या दस्तांवर पाच टक्के  मुद्रांक शुल्काची मागणी केली जात आहे. परिणामी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे निरीक्षण अवधूत लॉ फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.

शासनाने जाहीर केलेली सवलत महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील अनुच्छेद २५ खंड (ब) अन्वये होणाऱ्या दस्तांना दिली आहे. म्हणजेच विक्री करारनामा आणि अभिहस्तांतरण पत्राला ही सवलत लागू आहे. अन्य दस्तांपैकी तारण किंवा भाडेकरार अशा प्रकारच्या दस्तांना ही सवलत लागू नाही. त्यामुळे अन्य प्रकारच्या दस्तांना पूर्वीप्रमाणेच पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाने दिलेल्या सवलतींनुसार राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडून (एनआयसी) संगणकप्रणालीमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.

– ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक