मराठी भाषा-संस्कृती आणि मराठी शाळांची घटती संख्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून चर्चा होते, एवढेच नव्हे तर चिंतादेखील व्यक्त केली जाते. मात्र, भाषा टिकविण्यासंदर्भात कोणत्याच पातळीवर ठोस प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारने स्वतंत्र भाषा विद्यापीठ स्थापन करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नसला तरी एका वाचनालयाने या स्वरूपाचे स्वायत्त विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्टय़ांमुळे महाराष्ट्रातील मराठी वाचकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयातर्फे मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संवर्धनाचे स्वायत्त विद्यापीठ सुरू होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांची या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली आहे. या स्वायत्त विद्यापीठामध्ये साहित्य आस्वाद शिबिर, दिवाळी अंकांच्या संपादकांसाठी कार्यशाळा, मराठी प्राचीन साहित्य ते समकालीन साहित्याच्या अभ्यासासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, संत साहित्याचे अभ्यासक अरिवद दोडे आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मििलद जोशी या विद्यापीठासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. या विद्यापीठाचे विशेष वैशिष्टय़ म्हणजे ख्रिस्ती, बौद्ध आणि जैन साहित्याची दालने जानेवारी २०१५ पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी डॉ. अनुपमा उजगरे, अन्नदाते रमेश शिंदे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती ग्रंथसखा वाचनालयाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी दिली.
भाषा विद्यापीठाचा निर्णय दुरापास्त
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळांपुढील आव्हाने वाढत आहेत. तर, मराठी पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेण्यालाच प्राधान्य देत असल्याने मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या विदारक पाश्र्वभूमीवर मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र भाषा विद्यापीठ सुरू करावे, अशी शिफारस सरकारनेच स्थापन केलेल्या भाषा सल्लागार समितीने केली आहे. या संदर्भातील निर्णय हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अखत्यारित असलेल्या मराठी भाषा विभागाने घ्यावयाचा आहे. आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता दुरावली असली तरी एका ग्रंथालयाने अशा स्वरूपाचे स्वायत्त विद्यापीठ सुरू केले आहे.