आपली नक्कल करतो अशा गैरसमजातून एका शिक्षकाने विद्यार्थाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधात विद्यार्थ्याच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील शाळेत ही घटना घडली.

सविस्तर माहिती अशी, शंकर महादेव खोचरे (वय १४) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता ८ वीत शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थीनीला आडनावाने हाक मारली, त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली, यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरला घरीही जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. घरी आल्यानंतर शंकरने आईला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी शंकरची आई बबिता खोचरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मारहाण करणारे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, वर्गात विद्यार्थांचा गोंधळ सुरू होता. एका विद्यार्थिनीला मी आडनावावरून शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी माझी बोबडी वळली तेच ऐकून वर्गातील विद्यार्थी संबंधित मुलीला चिडवत होते. ते पाहून मी काही विद्यार्थांना हाताने मारले. त्यानंतर शंकर हा उद्धटपणा करीत दुसऱ्या विद्यार्थांचे नाव घेत मुलीला चिडवत होता. याविषयी मी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली होती.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.