रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १७८ सफाई सेवकांना महापालिका सेवेत कायम करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे सेवक १९९५-९६ पासून महापालिका सेवेत रोजंदारीवर काम करत आहेत.
अनेक वर्षे सेवेत राहूनही सेवेत कायम करून घेण्यात येत नसल्याबद्दल १७८ सफाई सेवकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सेवेत कायम करण्याबाबतचा त्यांचा न्यायालयीन लढा अनेक वर्षे सुरू होता. गेली अनेक वर्षे रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या या सेवकांना महापालिकेने कायमस्वरुपी सेवेत घ्यावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
या निकालाची माहिती समजल्यानंतर शनिवारी सफाई सेवक मोठय़ा संख्यने महापालिका भवनासमोर जमले होते. त्यांनी फटाके वाजवून या निकालाचा आनंद साजरा केला. महापालिका कामगार संघटनेच्या मुक्ता मनोहर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या लढय़ात सेवकांना न्याय मिळाला, अशी भावना यावेळी व्यक्त होत होती. तशा घोषणाही कामगार व सेवक देत होते.
महापालिकेने वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना राबवली असून या योजनेअंतर्गत कामगारांसाठी घरांची बांधणी करण्यात आली आहे. या योजनेत ४५ सफाई सेवकांना सदनिका देण्याचा कार्यक्रम महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. कसबा-विश्रामबागवाडा, औंध, भवानी पेठ, घोले रस्ता, वारजे, कोथरूड, सहकारनगर, ढोले पाटील रस्ता आदी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सफाई सेवकांना या सदनिका देण्यात आल्या आहेत.