29 September 2020

News Flash

थुंकलात, तर पुसावे लागेल!

रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या ४०० जणांवर तीन तासांत पालिकेची कारवाई

तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पालिकेने सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे. दंडाबरोबरच अस्वच्छ केलेली जागा संबंधितांकडून स्वच्छही करून घेतली जात आहे.

रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या ४०० जणांवर तीन तासांत पालिकेची कारवाई

नव्या वर्षांत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाश्र्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाकडून शहर स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर कारवाईला पालिकेने सुरुवात केली आहे. सोमवारी तीन तासांत चारशेजणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यामुळे त्यांच्याकडून संबंधित जागाही स्वच्छ करून घेण्यात आली.

स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत पालिकेने स्वच्छ पुरस्कार, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई असे उपक्रम हाती घेतले आहेत. ‘लक्ष्य’ हे मोबाइल अ‍ॅपही विकसित करण्यात आले असून त्याद्वारे प्रभागातील पाहणीचे निकष नोंदविण्यात सुरुवात झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका केल्यास जागेवरच दंड आकारण्याची कारवाईही वेगात सुरू झाली आहे. विभागस्तरावर एक आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक अशी एकूण सोळा पथके त्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. गेल्या आठवडय़ात १६० जणांवर ही कारवाई झाली होती. त्यानंतर कारवाईने वेग घेतला असून सोमवारी दुपारी १२ ते दोन या कालावधीत एकूण ४०० जणांवर कारवाई करून ४४ हजार ५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद महापालिकेने यापूर्वीच केली आहे. यापूर्वीही तशी मोहीम हाती घेण्यात आली होती. कालांतराने ती थंडावली. त्यानंतर केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१६ रोजी अधिसूचना काढून देशभरात घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी सुरू केली. त्याला अनुसरून राज्य शासनाने ७ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. त्याचा आधार घेत ही कारवाई सुरू आहे. पण पालिकेने घनकचरा व्यवस्थापन उपनियम तयार केले असतानाही ही कारवाई होऊ शकली नाही. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाश्र्वभूमीवर मात्र ही कारवाई सुरू झाली असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शहर हे स्व:चे घर आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा कचरा टाकणे टाळले पाहिजे, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.     – ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 5:01 am

Web Title: swachh bharat abhiyan in pune 4
Next Stories
1 सिंहगडावरील घाट रस्ता पुन्हा बंद होणार
2 जुन्नर हापूसची ओळख जपण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार!
3 राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात काँग्रेसला ठेंगा?
Just Now!
X