अभिनव कल्पनांचा महापालिकेकडून गौरव

सार्वजनिक स्वच्छता, कचरा, ग्लोबल वॉर्मिग आणि त्याचे धोके आदी प्रश्नांवर चर्चा होते, जनाजगृती होते. पण स्वत:च स्वच्छतेचे दूत होऊन सजगता दाखविणे ही बाब तशी विरळाच. पण हे शक्य केले आहे ते शहर पातळीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे केवळ चर्चेतून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पुणेकरांनी नव्या कल्पना पुढे आणत त्या साकारल्याही आहेत.

स्वच्छता दूतांच्या या अभिनव कल्पनांना महापालिकेकडून गौरविण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत बक्षीस मिळविणे हा या स्पर्धकांचा हेतू नसून शहर स्वच्छ राहावे यासाठी गेली अनेक वर्षे हे सर्व जण वैयक्तिक पातळीवर कार्यरत आहेत. महानगरपालिकेने ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाद्वारे नागरिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी तसेच चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत शहरातील नागरिकांना ‘ स्वच्छ पुरस्कार ’ जाहीर करण्यात आले. या विजेत्यांशी  ‘लोकसत्ता’ने संवाद साधला असता अभियानात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मधुमती  साठे यांचा ‘इटींग ड्रम’, शनिवार पेठेतील विजय देसाडला यांची गच्चीवरील बाग हे उपक्रम स्वच्छतेच्या बाबतीत सजगता दर्शविणारे आहेत.

घरातील कचरा ही मोठी समस्या असून त्याची विल्हेवाट कशी लावावी हा अनेकांपुढे येणारा प्रश्न आहे. परंतु ‘इटींग ड्रम’ सारखी आगळी वेगळी कल्पना घरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यास मदत करते. साठे यांनी घरातील अडगळीतील एक ड्रम वापरुन त्यात दिवसभरातील घरातील ओला कचरा साठवून ठेवला. साठवलेल्या कचऱ्यात काही दिवसांनी एक झाड लावले. साचवलेल्या कचऱ्याचे विघटन होऊन त्याचे खतात रुपांतर होऊन झाडाच्या वाढीसाठी ते पोषक ठरते म्हणून त्यांनी या संकल्पनेला ‘इटींग ड्रम’ हे नाव दिले.

देसाडला म्हणतात,की बाग करण्यासाठी अंगणच हवे तरच छान बाग होते असे म्हणणाऱ्यांनी एकदा आमच्या बागेला येऊन भेट द्यावी. घराच्या गच्चीवर आमची ३००० चौ. फुटाची बाग पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कचरा नेण्यासाठी गाडी वेळेवर येत नाही, किती दिवस घरात कचरा साचविणार, दुर्गंधी येते आदी तक्रारी नागरिकांकडून येत असतात. परंतु तक्रारी करण्यापेक्षा आपण काहीतरी पाऊल उचलणे गरजेचे आहे, या भावनेतून ही बाग साकारली. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यापेक्षा लहान मुलांना कचरा समस्या किती गंभीर आहे याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. त्यांना इतर पर्यटनस्थळी नेण्यापेक्षा ऊरुळी कांचन कचरा प्रकल्प दाखवून कचरा समस्या किती  आहे याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.

गंधाली जाधव म्हणतात, कचऱ्याच्या समस्येविषयी जागृती वाढली आहे. नागरिकांना या समस्येवर मात करण्याची इच्छा तर आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. इच्छेबरोबरच प्रयत्नांची जोडदेखील तेवढीच आवश्यक आहे.