पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशामक विभागाकडून देण्यात आली.

बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल कात्रज येथील पंपावर नेले जात होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ‘घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही पेट्रोल, डिझेल ज्या भागात पडले होते. तिथे वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला. मात्र तोवर टँकर मधील अंदाजे पाच हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल पाचशे मीटर भागात वाहून गेले होते. या घटनेमुळे कोणतीही घटना घडू याची काळजी घेण्यात आली असून उलटलेला टँकर क्रेनच्या रस्त्याच्या कडेला नेण्यात आला आहे’, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात टँकर चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.