चहा विकून सीए करणारा सोमनाथ गिराम यापुढे शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेचा ‘ब्रँड अँबॅसडर’ असेल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.
डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या पदवीप्रदान समारंभात तावडे बोलत होते. या वेळी सोमनाथचा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, एनएसडीचे संचालक प्रद्युम्न व्यास, विभागप्रमुख निनाद पानसे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅनिमेशन गेमिंग, इंडस्ट्रियल डिझाईन शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.
यावेळी तावडे म्हणाले, ‘सोमनाथ याने इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बॅसडर म्हणून सोमनाथ यापुढे काम करेल. शासनाने सध्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या योजनांमुळे डिझाईन क्षेत्राची मागणी वाढली आहे. मागणी आणि कुशल मनुष्यबळ यातील तफावत भरून काढण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.
चहावाल्यांना अच्छे दिन!
‘सध्या चायवाल्यांना अच्छे दिन आले आहेत,’ अशी कोटी तावडे यांनी केली. ‘चायवाले मोठय़ा पदापर्यंत जाऊ शकतात. चहावाले पंतप्रधान झाले आता हे दुसरे उदाहरण आहे,’ असे ते म्हणाले.
शिक्षण संचालकांवर ठपका
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांना जबाबदार धरण्यात आले आहे. याबाबतच्या शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिलेल्या अहवालात माने यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या वृत्ताला तावडे यांनी दुजोरा दिला. मात्र माने यांच्यावरील कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नाही.