पुणे महापालिका शिक्षण मंडळातील दहावी आणि बारावीच्या १३५ विघार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरले नसल्याचा धक्कादायक प्रकार परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडकीस आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ११ लाख रुपयांचा दंड संबंधित शिक्षकांनी भरल्याचा प्रकार  महापालिका सर्वसाधारण सभेत सोमवारी उघडकीस आला. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क उशिरा भरल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सभेत दिले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरवात होताच काँग्रेसच्या नगरसेविका आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क उशिरा भरण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील दहावीच्या ७० आणि बारावीच्या ६५ अशा १३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क भरण्यात आले नसल्याचा हा प्रकार बारावी परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडकीस आला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून संबंधित शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दंडासहित तब्बल ११ लाख रुपये विलंब शुल्क भरले. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले, याकडे कमल व्यवहारे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे पसे घेऊन एक शिक्षक फरार झाला आहे. त्याबाबत काय कारवाई केली असा प्रश्नही व्यवहारे यांनी या वेळी उपस्थित केला. या विषयावर निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, १३५ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वेळेत भरले गेले नाही. त्यामुळे ११ लाख रुपये भरण्यात आले. या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई केली जाईल.