मराठीतील पहिले ब्रीथलेस गीत तयार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव समाविष्ट झालेल्या चिंचवडच्या तेजस चव्हाण याच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार महापालिकेच्या सभेत करण्यात आला.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तेजस चव्हाण, विरोधी पक्षनेते कैलास कदम, कबड्डीपटू ऐश्वर्या शिंदे, धावपटू प्रतीक्षा थोरात, पराग पाटील आदींचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपमहापौर राजू मिसाळ, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी महापौर आर. एस. कुमार, भारती फरांदे, गटनेते अनंत कोऱ्हाळे, सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.
तेजस चव्हाण वाल्हेकरवाडी येथे राहतात. त्यांनी डॉ. अमोल कोल्हे तसेच बेला शेंडे यांच्यासमवेत मराठीत पहिले ब्रीथलेस गाणे तयार केले. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली. या निमित्ताने त्यांचा पालिका सभेत सत्कार करण्यात आला. कैलास कदम यांना राज्यशासनाचा नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.