श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे अनुदानात वाढ करण्याचा निर्णय

शहरातील विविध मंदिरांना श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक दिवाबत्ती अनुदानात वाढ करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये नित्यपूजेसाठी दिले जाणारे अनुदान अगदीच तुटपुंजे होते. संस्थानने गेल्या दोन वर्षांपासून मंदिरांना वार्षिक एक हजार रुपयांचे दिवाबत्ती अनुदान केले आहे.

शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये असलेली मंदिरे ही जुन्या पुण्याची ओळख. या मंदिरांना पेशवाईमध्ये पेशव्यांकडून समईतील तेलवात आणि अगरबत्ती लावून पूजाअर्चा करण्यासाठी म्हणून दिवाबत्ती अनुदान दिले जात होते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतरही ही प्रथा सुरूच राहिली. शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध ३५ मंदिरांना अशा स्वरूपाचे दिवाबत्ती अनुदान दिले जाते. सदाशिव पेठ येथील गाय आळीतील राम मंदिर आणि कसबा पेठ येथील नीलकंठेश्वर मंदिर या दोन मंदिरांचे अनुदान सर्वात कमी म्हणजे नऊ रुपये होते. तर, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर, शनिवार पेठ येथील ॐकारेश्वर मंदिर आणि अमृतेश्वर मंदिर या तीन मंदिरांचे वार्षिक अनुदान शंभर रुपयांपेक्षा अधिक होते. उर्वरित मंदिरांच्या दिवाबत्ती अनुदानाची रक्कम ही शंभर रुपयांच्या आतच आहे, अशी माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानने १९७७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेमध्ये नमूद केली आहे.

संस्थान देत असलेले अनुदान तुटपुंजे आहे यात शंकाच नाही. पण, तरीही शहरातील मंदिरांचे पुजारी आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य अगदी आनंदाने हे अनुदान घेऊन जातात हा आमचा अनुभव आहे. दिवाबत्ती अनुदानामध्ये वाढ केली जावी, अशी मागणी कोणत्याही मंदिराच्या प्रमुखांनी केली नव्हती. मात्र, सध्याची वाढती महागाई ध्यानात घेऊन विश्वस्त मंडळाने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. अर्थात वार्षिक एक हजार रुपये ही रक्कमही फार नाही हे सध्याचे वास्तव आहे. पण, पेशव्यांची ही प्रथा सुरू ठेवताना त्यामध्ये थोडीशी भर घालू शकलो याचे समाधान असल्याची भावना पंडित यांनी व्यक्त केली.

श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे विविध मंदिरांना दिले जाणारे दिवाबत्ती अनुदान अगदीच तुटपुंजे आहे याची जाणीव संस्थानच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना होती. म्हणूनच मंदिरांच्या वार्षिक अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. त्यानुसार दोन वर्षांपासून प्रत्येक मंदिराला वार्षिक एक हजार रुपयांचे दिवाबत्ती अनुदान करण्यात आले आहे.

– सुधीर पंडित, श्री देवदवेश्वर संस्था