केंद्र सरकारने राज्यातील साखर उद्योगासाठी ८ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, हे केवळ ४ हजार ७० कोटीच असल्याची बाब शासन निर्णयातून समोर आली आहे. त्यामुळे केंद्राचे हे पॅकेज फसवे असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या अशा धोरणांमुळे आणि फसव्या पॅकेजमुळे साखर कारखाने आणि शेतकरी अडचणीमध्ये सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून साखरेचे २७० लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ३२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याने त्यांचा अंदाज चुकला. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा असताना देखील हा अंदाज कसा काय चुकला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील वर्षी देखील उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आद्याप काही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. साखर उत्पादनातून अधिक पैसे मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळत आहे. या पिकाचे अधिक उत्पादन घेतल्यास भविष्यात हे पिक नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भुमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

८० लाख टन साखर सरकारने निर्यात करावी. इथेनॉलचा दर ४० वरून ५३ करावा आणि साखर उद्योगाच्या पॅकेजबाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा यंदाच्या चालू वर्षांचा गळीत हंगाम अडचणीमध्ये सापडणार हे निश्चित आहे. या मागण्यांची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पाकिस्तानमधून ३ लाख टन साखर का? : हर्षवर्धन पाटील
परदेशातून २१ लाख टन साखर आयात करण्यात आली. त्यामध्ये पाकिस्तानमधून आलेल्या ३ लाख टन साखरेचा समावेश आहे. यातून या सरकारची मानसिकता दिसून येते. पाकिस्तानची साखर आपल्याकडे आणणे म्हणजे दुर्देवी बाब असल्याचे पाटील म्हणाले.