हिंजवडीतील महत्त्वाचे दोन रस्ते एकेरी करण्याचा निर्णय

हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन सोमवारी अचानक या रस्त्यावर उतरले. तेथील परिस्थितीची पाहणी करून हिंजवडीकडे जाणाऱ्या दोन मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिले.

हिंजवडी येथील वाहतुकीच्या समस्येमुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, कर्मचारी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतुकीच्या प्रश्नाचा फटका माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनाही बसत आहे. पिंपरी आयुक्तालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजवडीचा दौरा केला होता. त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. शिवाजी चौकातून भूमकर चौकापर्यंत येण्यासाठी त्यांना दोन तास लागले होते. महामार्ग विभागाचे महासंचालक हे पद भूषविलेल्या पद्मनाभन यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पद्भार स्वीकारल्यानंतर सांगितले होते.

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतील लहान-मोठय़ा मिळून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. हिंजवडीतील वाहतूक समस्येबाबत ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवडय़ात सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पोलीस आयक्तांनी पद्मनाभन यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचानक हिंजवडीतील वाहतुकीची माहिती घेण्यासाठी या भागाला भेट दिली आणि ते येथील रस्त्यावर उतरले.

पाहणीनंतर दोन मार्ग एकेरी

हिंजवडीत आल्यानंतर पद्मनाभन यांनी तेथील सर्व मार्गाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर स्थानिक नागरिक आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील अभियंते तसेच कंपन्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. त्यांच्या सूचना लक्षात घेऊन िहजवडीतील दोन मार्ग एकेरी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याचे आदेश त्यांनी वाहतूक विभागाला दिले. हिंजवडीतील शिवाजी चौक ते भूमकर चौक (भुजबळ वस्ती) आणि लक्ष्मी चौक ते विनोदे वस्ती मार्गे भूमकर चौक हे दोन मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांबरोबर हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आणि वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे आदी उपस्थित होते.

समस्या अशी!

* हिंजवडी आयटी पार्ककडे सहा वेगवेगळ्या मार्गाने जाता येते. मात्र भूमकर चौक आणि वाकड चौक हे प्रवेशाचे केवळ दोन मार्ग आहेत. या मार्गापासून हिंजवडी आयटी पार्कचे अंतर सहा किलोमीटर असून त्यासाठी किमान दीड ते दोन तास एवढा वेळ लागतो.

*  पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पीएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. मात्र शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि उपाययोजनांचा आराखडा कागदावरच राहिल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

*  मुख्य रस्ते आणि उपरस्त्यावरील खड्डय़ांची दुरुस्ती करावी, रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, सूस-नांदे-चांदे ते हिंजवडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, म्हाळुंगे ते हिंजवडी रस्ता पूर्ण करावा, मारुंजीकडून येणारा रस्ता विकसित करावा अशा मागण्या सातत्याने होत आहे.