पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू निगडी प्राधिकरण परिसरात एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून, चोरट्याने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत या वृद्ध महिलेस मारहाण करून  सोन्या- चांदीचे दागिणे व  ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख रुपयांचा लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली असून त्यांच्या हातावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. निगडी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली असून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमलता पाटील असे  वृद्ध महिलेचे नाव आहे. हेमलता या गायत्री हेरिटेज सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण परिसरात उच्चभ्रू वसाहत आहे. येथील गायत्री सोसायटीमध्ये हेमलता या एकट्याच राहतात. सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मागच्या गेटने आत येऊन दोन चोरट्यांनी वृद्ध हेमलता यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ५० हजार असा एकूण चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या गंभीर घटनेत हेमलता यांच्या हातावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत.

दरम्यान, हेमलता यांची मुलगी डॉक्टर असून काही अंतरावर निगडी प्राधिकरणात राहते. संबंधित घटनेची माहिती त्यांनी जावई आणि मुलीला दिली. दोघांनी तातडीने राहत्या घरी येऊन हेमलता यांना रुग्णालयात दाखल केले.  या घटने प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.