|| अविनाश कवठेकर

वाहतूक कोंडी, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची प्रभागात समस्या

पुणे : महापालिके च्या येरवडा या प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजी मंडईचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून कायम राहिला आहे. भाजी मंडईसाठी अंदाजपत्रकात तरतूद होत असतानाही या भागासाठी हक्काची भाजी मंडई नाही. प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गोल्फ चौकातील उड्डाण पुलाची रचना बदलण्यात आल्याचा आरोप करत नागरिकांनी उड्डाण पुलाला विरोध दर्शविला आहे. वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणीपुरवठा, महापालिके च्या हॉटमिक्स प्रकल्पातून येणारा धूर अशा समस्या या प्रभागात दिसून येतात.

बहुतांश वस्ती, गावठाण असा मोठा भाग असलेल्या येरवडा प्रभागातील अ‍ॅड. अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, संजय भोसले शिवसेनेचे नगरसेवक असून अश्विनी लांडगे एमआयएमच्या नगरसेविका आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागात भाजी मंडईसाठी बहुमजली इमारत बांधण्याची घोषणा सातत्याने झाली आहे. मात्र पंधरा वर्षांपासून भाजी मंडई उभी राहू शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

भाजी मंडई नसल्यामुळे रस्त्यावरच भाजी विक्रेते बसतात. पदपथ व्यापतात. त्यातून वाहतूक कोंडीही होत असल्याचे चित्र आहे. भाजी मंडईसाठी यापूर्वी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली होती. मात्र त्याला गती देता आली नाही. एका बाजूला ही परिस्थिती असताना सुभोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. भिंतींचे सुशोभीकरण, कमानी उभारणे अशा दिखावू कामांसाठी नगरसेवकांनी कोट्यवधी रुपये खर्च के ले आहेत.

लक्ष्मीनगर, भोसले वस्तीसह अन्य काही भागाला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. गणेशनगर, नवी खडकी गावठाण परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्नही नगरसेवकांना सोडविता आलेला नाही. लक्ष्मीनगर, अशोकनगर परिसरात होत असलेला पाणीपुरवठा सांडपाणी मिश्रित असतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पदपथांसह मुख्य रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. फु लेनगरकडे जाणारा पीएमपीचा मार्ग रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे बंद झाला आहे, असे नागरिक सांगतात.

पदपथांची दुरवस्था झाली असून प्रशस्त पदपथ प्रभागात नाहीत. ज्या ठिकाणी पदपथ आहेत, तेथे अतिक्रमणे झाली आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे बऱ्यापैकी असली, तरी त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नाही. सांडपाणी वाहिन्या फु टणे, वाहिन्या तुंबणे असे प्रकारही सातत्याने होत असतात, असे नागरिक सांगतात.

येरवड्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाण पूल उभारण्याची घोषणा करण्यात आली. गोल्फ क्लब चौकात काही वर्षांपूर्वी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर भुयारी मार्गाऐवजी उड्डाण पुलाची घोषणा करण्यात आली. उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी सुटेल, असा दावा करण्यात येत होता. मात्र उड्डाण पुलाची रचना बदलण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडेल, असा आरोप करत नागरिकांनी उड्डाण पुलाला विरोध दर्शविला आहे. महापालिके चा हॉटमिक्स प्रकल्प या प्रभागात आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या धुराचा नागरिकांना मोठा त्रास होतो. त्यामुळे तो स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

येरवडा, येरवडा गावठाण, रामनगर, जयजवाननगर, लक्ष्मीनगर, भोसलेनगर, अशोकनगर, गणेशनगर, नवी खडकी गावठाण, भोसलेवस्ती, गाडीतळ, बालाजीनगर, सुभाषनगर, माणिकनगर

नागरिक म्हणतात

भाजी मंडई रस्त्यावरच बसत असल्यामुळे पदपथांवरून चालणे अडचणीचे ठरते. पिण्याच्या पाण्याला वास येतो. संध्याकाळी अनेक ठिकाणी वाहूतक कोंडी होते. दुचाकी, चारचाकी गाड्या अस्ताव्यस्त रस्त्याच्या बाजूला लावल्या जातात. मोकाट श्वानांचाही मोठा उपद्रव आहे.       – दीपक कदम, रामनगर

कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. वस्ती भागात कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे परिसरात नेहमी दुर्गंधी असते. स्वच्छतागृहांचीही दुरवस्था आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. बसथांब्यांची दुरवस्था आहे. पावसाळ्यात सातत्याने सांडपाणी वाहिन्या तुंबतात. त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचते.                  – शिल्पा निकम, येरवडा

प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा

महापालिके च्या गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नागरिकांना भरघोस आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, कोणती कामे झाली, कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या याचा आढावा ‘प्रभागाचे प्रगतिपुस्तक’ या वृत्तमालिके तून दररोज घेतला जात आहे.

प्रभागांमधील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक काय करत आहेत, गेल्या साडेतीन वर्षांत कोणत्या समस्या सुटल्या, कोणती कामे रखडली, कोणती कामे झाली याची सविस्तर माहिती या वृत्तमालिके तून देण्यात येत आहे. वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असून विविध प्रभागातील नागरिकांनी त्यांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. यातील काही निवडक समस्यांची माहिती या सदरातून प्रसिद्ध के ली जात आहे.

नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, प्रश्न पुढील ई-मेल पत्यावर पाठवावेत. समस्यांचे छायाचित्रही पाठविता येईल. आपले नाव आणि संपर्क क्रमांकही अवश्य द्यावा.

इ-मेल-lokpune4@gmail.com

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

प्रभागातील अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. नगरसेवक के वळ कमानी उभारणी, भिंती रंगविणे या प्रकारच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. भाजी मंडईचा प्रश्नही कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही. उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. भाजी विक्रे ते पदपथांवरच बसतात. –  सुनील कदम, मनसे

प्रभागातील समस्या कामय आहेत. दिखाऊ कामांवर खर्च होत आहेत. सांडपाणी वाहिन्या सातत्याने तुंबतात. अनेक भागाला गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. नगरसेवकांना कोट्यवधी रुपये विकासकामांसाठी मिळत असूनही निधी नक्की कु ठे जातो, असा प्रश्न पडतो. नवी कोणतीही कामे प्रभागात झालेली नाहीत. – संतोष राजगुरू, भाजप

लोकप्रतिनिधी म्हणतात

सांडपाणी वाहिन्यांचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे सांडपाणी वाहिन्या बदलण्यात आल्या. ही कामे झाली आहेत.  पाण्याचा प्रश्नही सोडविण्याला प्राधान्य दिले आहे.  स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. रस्त्यावर, पदपथांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी सातत्याने महापालिके बरोबर पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांशी दैनंदिन संवाद आहे.  – अ‍ॅड. अविनाश साळवे,        नगरसेवक

लक्ष्मीनगर येथे शाळेची जुनी इमारत पाडून तेथे नवी इमारत उभारण्यात येत आहे. विविध ठिकाणी व्यायामशाळांची उभारणी करण्यात आली आहे. समाजमंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. पाणी टंचाई असलेल्या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पथ दिवे बसविण्यात आले आहेत. सांडपाणी वाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. – श्वेता चव्हाण, नगरसेविका

प्रभागात पंधरा वर्षापूर्वीच्या जीर्ण वाहिन्या बदलण्याचे कामाला प्राधान्य देण्यात आले. पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न असल्यामुळे नवीन नळजोडही देण्यात आले. जलवाहिन्या नव्याने टाकण्याची कामेही पूर्ण झाली आहेत. प्रभागातील मुख्य रस्त्यांची कामे करण्यात आली असून रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. – अश्विनी लांडगे, नगरसेविका

सांडपाण्याचा मुख्य प्रश्न होता. त्यामुळे अशोकनगर, माणिकनगर या भागात मोठ्या व्यासाची वाहिनी टाकण्यात आली आहे. अंतर्गत वाहिन्यांची कामे पूर्ण के ली आहे. भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीप्रश्नही सुटला आहे. रस्त्याची काँक्रिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. उद्याने विकसित करण्याची कामे सुरू झाली आहेत. गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे.

–  संजय भोसले, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

  • भाजी मंडई रस्त्यावर
  •   अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
  •   पदपथांवर अतिक्रमणे
  •   मुख्य रस्त्यावर कोंडी
  •   सांडपाणी वाहिन्यांची अर्धवट कामे

नगरसेवकांचे दावे

  •   वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना
  • साठवणूक टाक्यांची कामे प्रगतिपथावर
  •  सांडपाणी वाहिन्यांच्या कामांना प्राधान्य
  •  सक्षम आरोग्य सुविधा
  • अतिक्रमणे रोखण्यासाठी उपाययोजना

नगरसेवक

  • अ‍ॅड. अविनाश साळवे
  •  श्वेता चव्हाण
  •   अश्विनी लांडगे
  •    संजय भोसले.