खासदार उदयनराजे भोसले हे राजे आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांची भाजपात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर ती इच्छाही पूर्ण केली जाईल. उदयनराजे भोसले भाजपात येणार आहेत त्यांचं स्वागत आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी उदयनराजेंवरील प्रश्नाला उत्तर दिलं.

मागील तीन-चार दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांबाबत काही विचारलं असता त्यातील काही नेत्यांचा १ तारखेला आणि काही नेत्यांचा त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान भाजपात प्रवेश होईल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात प्रवेश करणार असल्यास त्यामुळे युतीत बिघाडी होईल का? असा प्रश्न विचारला असता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर नारायण राणे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

देशभरात मंदीमुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे त्याचा परिणाम विधान सभा निवडणुकीवर होईल का त्यावर ते म्हणाले की आपल्याच देशात मंदी नसून जागतिक मंदी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.