विविध शाखांतील वीस सदस्य संस्थांचा महासंघात समावेश

गुणवत्तापूर्ण संशोधन करण्याऐवजी बोगस संशोधन पत्रिकांमध्ये लेख, संशोधन छापण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) महासंघ स्थापन करण्याचा विचार करत आहे. गुणवत्तापूर्ण संशोधन पत्रिकांची यादी तयार करण्यासाठी ‘कन्सॉर्टियम ऑफ अ‍ॅकॅडमिक अँड रीसर्च एथिक्स’ (केअर) स्थापन करण्याची कल्पना विचाराधीन आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन या महासंघाचे अध्यक्ष असतील.

यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बाबत चर्चा करण्यात आली. संशोधन पत्रिकांची ‘केअर’ स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे यूजीसीने संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या महासंघामध्ये साहित्य, तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे, ललित कला, अभियांत्रिकी, वैद्यक आदी वीस शाखांमधील राष्ट्रीय संस्थांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

या सदस्य संस्था संबंधित शाखांमधील गुणवत्तापूर्ण संशोधन पत्रिकांची ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये यादी तयार करतील. ही यादी विशेष विभागाकडून (स्पेशल सेल) तपासण्यात येईल. त्यानंतर ‘केअर रेफरन्स लिस्ट ऑफ क्वालिटी जर्नल्स’ या नावाने ही यादी ओळखली र्जाल. या यादीची देखभाल ‘केअर’कडून केली जाईल. ही यादी सर्व शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरली जाईल.

वेगवेगळ्या शाखांतील नव्या संशोधन पत्रिकांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रिया ‘केअर’ तयार करेल. त्यानंतर त्या संदर्भातील प्रस्ताव मागवले जातील. या प्रस्तावांची विशेष विभागाकडून काटेकोरपणे छाननी करून घेण्यात येईल.

‘केअर रेफरन्स लिस्ट ऑफ क्वालिटी जर्नल्स’ अस्तित्वात येईपर्यंत सध्याची यूजीसी ‘अ‍ॅप्रुव्ह्ड लिस्ट ऑफ जर्नल्स’ वैध राहील. केअरने तयार केलेली यादी यूजीसी  वेळोवेळी अद्ययावत करून जाहीर करेल आणि महासंघातील संबंधित सदस्य संस्थांच्या संकेतस्थळावरही यादी प्रसिद्ध केली जाईल, असे यूजीसीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महासंघातील सदस्य संस्था

* भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर)

* भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषद (आयसीपीआर)

* भारतीय इतिहास संशोधन परिषद (आयसीएचआर)

* साहित्य अकादमी

* ललित कला अकादमी

* भारतीय भाषा केंद्र (सीआयआयएल)

* भारतीय आधुनिक अभ्यास संस्था (आयआयएस)

* राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण संशोधन परिषद (एनसीईआरटी)

* अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई)

* शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)

* भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)

* भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)

* केंद्रीय भारतीय वैद्यकीय परिषद (सीसीआयएम)

* राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (एनएई)

* राष्ट्रीय विज्ञान अकादमी (एनएएसआय)

* भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (आयएनएसए)

* भारतीय विज्ञान अकादमी (आयएएससी)

*राष्ट्रीय वैद्यक विज्ञान अकादमी (एनएएमएस)

* भारतीय विद्यापीठ संघटना (एआययू)

* केंद्र/राज्य सरकारच्या संबंधित परिषदा

* विशेष विभाग (स्पेशल सेल)

संशोधन पत्रिकांची यादी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठीच विविध संस्थांना एकत्र आणून ‘केअर’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत संबंधित संस्थांना पत्र पाठवून लवकरच बैठक बोलावली जाईल. त्यानंतर मार्चपासून यादी तयार करण्याचे काम सुरू होईल. हे खूप मोठे आणि महत्त्वाचे काम आहे.

– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग.