नऱ्हे भागामध्ये सहा मजली इमारत कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर मराठी बांधकाम व्यावयायिक संघटनेने (एमबीव्हीए) अनधिकृत बांधकामप्रश्नी पालिका व जिल्हा प्रशासनास सवरेतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. घर खरेदी करताना ग्राहकांनी सजगता ठेवण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे.
अनधिकृत बांधकाम ही गोष्ट अमान्यच असून, त्याला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जागरूकतेने घरखरेदी व संबंधित व्यवहार करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ग्राहकांचे प्रबोधन गरजेचे असून, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसाठी संघटना कोणत्याही सहकार्यासाठी तयार आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे यांनी व्यक्त केले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी नामवंत व नोंदणीकृत बांधकाम कंपनीकडूनच घराच्या खरेदी करावी. आपण घर खरेदी करीत असलेल्या प्रकल्पासाठी आर्किटेक्ट, आरसीसी कन्सलटंट तसेच योग्य ती कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे का, याची खात्री करूनच घराची खरेदी अवश्यक असल्याचेही दरोडे यांनी स्पष्ट केले.
वाढते शहरीकरण तसेच घरांची मागणी व पुरवठय़ातील तफावत लक्षात घेता सर्वासाठी घर अत्यावश्यक आहे. ही गरज पूर्ण करताना होणाऱ्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना घडतात. अनेकदा ग्राहक विविध आमिषांना बळी पडून घरांची खरेदी करतात. मात्र, संबंधित इमारतीच्या बाबतीत सर्व आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करण्यात आली होती की नाही, हे तपासणे देखील गरजेचे आहे, असे मतही संघटनेने व्यक्त केले आहे.