कोथरूड भागासह शहरातील कोणत्याही पादचारी भुयारी मार्गाचा वापर होत नसताना पौड रस्त्यावर आणखी एक पादचारी भुयारी मार्ग बांधण्याची दोन कोटी रुपयांची निविदा महापालिका स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा मार्ग बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्या ऐवजी भलत्याच ठिकाणी हा मार्ग बांधावा, अशी उपसूचना स्थानिक नगरसेवकाकडून देण्यात आली आणि जागाबदलाचा हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला.
पौड रस्त्यावर प्रभाग क्रमांक २९ मध्ये पीएमपी बसस्थानकाजवळ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा असल्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून हा भुयारी मार्ग पीएमपी डेपोसमोर बांधण्याचा मूळ प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. त्यासाठी दोन कोटींची निविदा मंजूर करण्याचा विषय स्थायी समितीपुढे आल्यानंतर त्याला स्थानिक नगरसेवक शंकर ऊर्फ बंडू केमसे यांनी उपसूचना दिली. या पादचारी भुयारी मार्गाची सध्याची जागा बदलून ती चांदणी चौकाच्या दिशेने शंभर मीटपर्यंत पुढे न्यावी आणि पीएमपी डेपोच्या पुढे धनलक्ष्मी पार्कसमोर हा पादचारी भुयारी मार्ग बांधावा, अशी उपसूचना केमसे यांनी या वेळी दिली. ही उपसूचना स्थायी समितीने एकमताने मंजूर केल्याचे समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुळात, प्रशासनाने पीएमपी डेपोसमोर असलेली पादचाऱ्यांची वर्दळ व एकूण पादचारी संख्या यांचे सर्वेक्षण केले होते व ती संख्या मोठी असल्यामुळे या जागेवर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे दिसून आले होते. त्यासाठी या कामाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात कामाची निविदा मंजूर करताना मात्र भलत्याच जागेसाठी उपसूचना देऊन भुयारी मार्गाचे ठिकाणच बदलण्यात आले आहे. याबाबत कर्णे गुरुजी यांना विचारले असता ते म्हणाले, की आम्ही जी जागा सुचवली आहे ती अधिकाऱ्यांनाही मान्य आहे. त्यामुळे तेथे हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वस्तुस्थिती काय आहे?
– शहरातील बहुतांश भुयारी मार्ग बंद अवस्थेत
– फक्त डेक्कन जिमखान्यावरील भुयारी मार्गाचा वापर
– कोथरूड भागात पाचवा पादचारी भुयारी मार्ग मंजूर
– मूळ ठिकाण पीएमपी डेपोसमोर, ते आता लांबवर हलवले