पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदी रुजू झालेल्या दिनेश वाघमारे यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये विविध बैठका घेत कामांचा आढावा घेतल्यानंतर प्रत्येक विभागाने सादरीकरण करावे, अशी सूचना दिल्या आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली असून, मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रवेशिका आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वाघमारे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. दोन दिवसांपासून सकाळी साडेनऊ वाजताच आयुक्त महापालिकेत येत आहेत. कर्मचारी गणवेशात नसतात, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना गणवेशाची सक्ती करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयात मोठय़ा संख्येने नागरिकांची वर्दळ असते. त्यांनाही प्रवेशिका आवश्यक करण्यात आल्या आहेत. तसा फलकच पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला आहे. आमदार महेश लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांसह आयुक्तांची भेट घेतली.
भाजपच्या शिष्टमंडळाने माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांचे स्वागत केले. यापूर्वीचे आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीमुळे नाराजीचा सूर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही वाघमारे यांच्या स्वागताची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी, सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.