भाजपवर कडाडून टीका

पुणे : मोदी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात येत असले तरी भुजबळ आणि कुशवाह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. देशातील पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल पहाता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाल्याची टीका भुजबळ यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यात येत असल्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुशवाह यांनी ही भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना या दोघांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

भुजबळ म्हणाले,की देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल पहाता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीवेळी विकासाच्या मुद्दय़ावर भाजपने भर दिला आणि निवडणूक जिंकली.

मात्र साडेचार वर्षांत विकास कुठेच दिसला नाही. त्यामुळेच जनतेने भाजपला नाकारले आहे. पाच राज्यातील निवडणुकीतून हे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही जनता भाजपला नाकारेल.

गेल्या निवडणुकीवेळी मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर झाले. जे पक्ष सोडून गेले त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी पुन्हा पक्षात येण्यास कोणतीही हरकत नाही.

कुशवाह म्हणाले, की निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक आश्वासने दिली होती. मात्र साडेचार वर्षांत ती पूर्ण करता आली नाहीत. केवळ संघाचा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मंत्रिमंडळात असताना कोणत्याही विषयावर चर्चा न करता पंतप्रधान निर्णय घेत होते. त्यामुळेच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भविष्यात स्वतंत्र लढणे किंवा महाआघाडीत जाणे किंवा तिसरी आघाडी स्थापन करणे असे पर्याय सध्या आहेत. मात्र योग्य वेळी त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.