करोनामुळे इतर उद्योगांप्रमाणेच ग्रंथविक्री आणि खरेदी व्यवहारावर आलेले ग्रहण शिथिलिकरणानंतरही कायम राहिले. ग्रंथ ही जीवनावश्यक बाब नसल्याने वाचकांची खरेदी थंडावली होती. मात्र मराठी प्रकाशकांच्या एकजुटीतून साकारलेल्या ‘वाचन जागर अभियाना’मुळे गेल्या दोन आठवडय़ात वाचकांच्या मनातील पुस्तक खरेदीबाबतची ‘टाळेबंदी’ उठली असून  राज्यभरात ग्रंथखरेदीत उत्साह दिसून आला.

दिवाळी अंकांसोबत सध्या चरित्रात्मक आणि माहितीपर पुस्तकांना वाचकांकडून सर्वाधिक मागणी होत आहे. टाळेबंदीत सवड आणि आवड असूनही पुस्तकांची उपलब्धता नव्हती.

या परिस्थितीतून सावरण्यासाठी  मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत आणि राजहंस या मराठीतील दहा नामवंत प्रकाशकांनी एकत्र येऊन दिवाळीनिमित्त १ नोव्हेंबरपासून खास ‘वाचन जागर अभियान’ सुरू केले. २५ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या अभियानात प्रत्येक प्रकाशकाची २५ याप्रमाणे वाचकप्रिय २५० पुस्तकांवर घसघशीत २५ टक्के सवलत देत वाचकांना अक्षरभेट देण्यात आली आहे.

झाले काय? करोनामुळे शिथिलिकरणानंतरच्या काही दिवसांत वाचक पुस्तकांच्या दुकानात खरेदीसाठी जायला घाबरत होते. जानेवारी ते मार्च या काळात प्रकाशित झालेली नवी पुस्तके वाचकांपर्यंत कोणत्याही माध्यमाद्वारे पोहोचली नव्हती. आता यात बदल होत आहे. सवलती आणि प्रदीर्घ काळापासून ग्रंथांपासून लांब असल्याने वाचकांची गेल्या पंधरा दिवसांतील खरेदी वाढली.

विक्री किती झाली यापेक्षाही व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली हा अभियानाचा हेतू सफल झाला. वाचकांकडून चरित्रात्मक आणि माहितीपर पुस्तकांसह नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांना मागणी आहे.

– प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन

वाचन जागर अभियानाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. २५० पुस्तकांवर सवलत देण्यात आली असल्याने वाचकांना खरेदीसाठी  चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.

– विकास परांजपे, ज्योत्स्ना प्रकाशन