पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. यात दररोज १५ ते २० जणांना हे कुत्रे चावा घेत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी चिंचवडमधील केशवनगर येथे कुत्र्याने चार जणांना चावा घेतला. यात दोन विद्यार्थी आणि नागरिकांचा समावेश आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चिंचवड परिसरातील केशव नगर आणि अन्य परिसरामध्ये कुत्र्यांनी दोन नागरिक आणि दोन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला आहे. जखमींना तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महापालिकेचे पशुवैद्यकीय प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहेत. पशुवैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. सतीश गोरे हे सेवानिवृत झाले असल्याने त्यांचे पद अद्याप रिक्त आहे. पशुवैद्यकीय विभागाची अवस्था सध्या रामभरोसे आहे. शहरात दररोज घटना घडत असताना उपाययोजना करण्यासाठी अधिकारीच नाही.

महापालिकेने याबाबत तीन संस्थाना कुत्री पकडण्याचे काम दिले आहे. त्या संस्था कुत्री पकडून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्याच परिसरात सोडून देते. दररोज ३० ते ३५ कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.डी.व्ही. बांदल यांनी दिली. मात्र शहरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या सरासरी १५ ते २० घटना घडत आहे. दर महिन्याला जवळपास १ हजार नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडतात. कुत्र्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका कुत्र्यांवर महापालिकाकडून ७०० रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. एवढे करूनही महापालिका प्रशासनाला यावर आळा घालण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.