तालुक्यातील इंचा येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत पाणी भरावे लागते. वारंवार संबंधित सर्वाना तक्रार निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे शनिवारी गावातील महिलांनी आपल्या मुला-बाळासह ग्रामपंचायतवर मोर्चा काढून पिण्याच्या पाण्याची मागणी लावून धरली.

पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या महिलांनी सांगितले, की पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी महिलांनी ग्रामपंचायत सरपंचासह ग्रामसेवक व सर्व संबंधितांना विनंती अर्ज करूनही त्याची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करण्याकरिता ग्रामपंचायतने बनावट व काल्पनिक अधिग्रहण दाखवून जनतेची व शासनाची फसवणूक चालविली असल्याचा आरोप केला आहे.

गावातील महिलांनी अ‍ॅड. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मुला-बाळांसह ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, ग्रामपंचायतने चुकीचे केलेले बोअर अधिग्रहण तत्काळ रद्द करावे, पाणी उपलब्ध करण्यासाठी पूर्णवेळ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा, कर्तव्यात कसूर केल्याने सरपंचावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) प्रमाणे अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, वर्ष २०१५ ते मे २०१८ पावेतो पाणी अधिग्रहण भंगार आणि पाणीपुरवठा योजनेतील संबंधित सर्व विहिरी, हातपंपाच्या नोंदी घेण्यात याव्या, आदी मागण्या केल्या असून, निवेदनावर अ‍ॅड. विजय राऊतसह गावातील ग्रामस्थ महिलांच्या सह्य़ा आहेत.