पुण्याच्या चार धरणांमध्ये आता १६.७६ टीएमसी (अब्ज घन फूट) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणातून ९३१ क्यूसेकने पाणी सोडले जात असून बुधवारीही हे पाणी सोडले गेले.

गेल्या वर्षी २७ जुलैला पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये ११.२५ टीएमसी पाणीसाठा होता. आताचा पाणीसाठा त्यापेक्षा साडेपाच टीएमसीने अधिक आहे. पाणीकपात न करता पुण्याला दीड टीएमसी पाणी अंदाजे महिनाभर पुरु शकते. त्या हिशेबात बुधवारी सकाळपर्यंत धरणात जमा झालेले १६.७६ टीएमसी पाणी केवळ पुण्याला अकरा महिने पुरु शकेल एवढे आहे.

काही दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाल्यानंतर खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडले गेले होते. हे पाणी पुढे उजनीला जाऊन मिळते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खडकवासलातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून पुण्याजवळच्या खेडेगावांना हे पाणी पिण्यासाठी उपयुक्त ठरते.