पिंपरी चिंचवडमध्ये एका २० वर्षांच्या तरुणाने नोकरीत आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या तरुणाने त्याच्या घरात गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. नितीन जाधव असे या तरुणाचे नाव असून त्याचे वय २० वर्षे होते. तो सोलापुरातील मंगळवेढा या गावाचा होता. बिग बाजारमध्ये अकाऊंट विभागात तो काम करत होता. मात्र काही कारणांमुळे त्याला दुसऱ्या विभागात काम करण्यास सांगण्यात आले. नितीनला दुसऱ्या विभागात काम करणे नितीनला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने राजीनामा दिला.

मात्र गेल्या चार दिवसांपासून तो कुठेही काम करत नव्हता. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते अशी माहिती नितीनचा मित्र अक्षयने दिली. अक्षय माने आणि नितीन जाधव हे दोघे एकाच भाड्याच्या घरात राहात होते. सोमवारी रात्री अक्षय कामावर गेला होता त्यावेळीच नितीनने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. मंगळवारी सकाळी अक्षय कामावरून परतल्यावर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.