भोसरीत टेल्को रस्त्यावरून दुचाकीवर जात असलेल्या तरुणावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू आहे.
अनिल विश्वकर्मा (वय २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा लांडेवाडी झोपडपट्टीकडून टेल्को रस्त्याने जात होता. त्या वेळी अज्ञात व्यक्तींनी त्यावर गोळीबार केला. तो दुचाकीवरून पडताना नागरिकांनी पाहिले. त्याला तत्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्या छातीमध्ये गोळी लागल्याचे दिसून आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यावर कोणी गोळीबार केला. कशामुळे केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी भोसरी एमआडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.