Premium

पुण्यात टपाल खात्यातील अधिकाऱ्यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार

विश्रांतवाडी, विमानतळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

crime in dombiwali
चार वर्षांपूर्वी घर सोडून ओडिशाला गेलेली मुलगी पुन्हा घरी(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

पुणे : टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहार प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत टपाल खात्यातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय ४२, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिघी कॅम्प टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी (वय ४०, फाॅर्च्युन सृष्टी, येवलेवाडी, कोंढवा), लिपिक भगवान श्रीरंग नाईक (वय ३६, रा. गणेश हाऊसिंग सोसायटी, दिघी, आळंदी रस्ता), विश्रांतवाडी भागातील धानोरी टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे (वय ३०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय ४९, रा. भैरवनगर, धानोरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी माळी, नाईक, लांडे, सूर्यवंशी यांनी आळंदी रस्त्यावरील दिघी कॅम्प टपाल कार्यालयात एकूण २७४ ठेवीदारांनी गुंतवलेली नऊ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्या रक्कमेपोटी १८ लाख ३५ हजार ११५ रुपयांची रक्कम धानोरीतील टपाल कार्यालयात जमा केली. या रक्कमेचा अपहार त्यांनी केला. ठेवीदारांच्या बनावट सह्या करुन त्यांनी टपाल खात्याची फसवणूक केल्याचे टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनाच मारहाण

विमानतळ पोलीस ठाण्यात ज्योतीराम फुलचंद माळी यांच्यासह रमेश गुलाब भोसले (रा. साळुंके विहार रस्ता, वानवडी), विलास एच. देठे (वय ५९, रा. तात्या टोपे सोसायटी, वानवडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलास देठे , फुलचंद माळी, रमेश भोसले उपडाकपाल म्हणून कार्यरत होते. माळी आणि भोसले यांनी ५९ ठेवीदारांकडून दोन कोटी ४७ लाख ६० हजार रुपये स्वीकारली. या रक्कमेवर मिळालेले चार लाख ९५ हजार २०० रुपयांचे कमिशन मिळाले. आरोपींनी मिळालेल्या कमिशनचा अपहार केला. देठे यांनी ठेवीदार तसेच सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम स्वीकारली. ठेवीची रक्कम स्वीकारण्यात आल्याची बनावट नोंद खातेपुस्तिकेवर केली. टपाल खात्याच्या फिनकॅप संगणकीय प्रणालीत नोंद केली नाही. ठेवीदारांनी जमा केलेल्या ४५ हजार ९०० रुपये रक्कमेचा अपहार केल्याचे टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 24 lakh rupees embezzled by postal department officials in pune pune print news rbk 25 ysh

First published on: 25-03-2023 at 15:55 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा