४८ लाखांचा दंड वसूल

पुणे : टाळेबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांकडून ३६ हजार ३१८ वाहने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वाहनचालकांना परत करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर संचारबंदी तसेच वाहतूकबंदीचे र्निबध जारी करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली. टाळेबंदीत पोलिसांनी एकूण मिळून ३६ हजार ८७० वाहने जप्त केली. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागारिकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेली वाहने पोलीस ठाण्यांच्या आवारात ठेवण्यात आली होती. दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाकडून र्निबध शिथिल केल्यानंतर वाहनचालकांनी वाहने परत देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वाहने परत देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३६ हजार ३१८ वाहने परत करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

५०० वाहने धूळ खात

टाळेबंदीत जप्त करण्यात आलेली बहुतांश वाहने मूळ मालकांना परत  करण्यात आली आहेत. अद्याप ५०० वाहनचालकांनी वाहने परत नेली नाहीत. त्यांनी  दंडाची रक्कम भरून तसेच आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वाहने परत घेऊन जावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.