पुणे : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठीवर (स्लीप) मतदानाची वेळ आणि दिनांक छापण्यात यावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आज (बुधवार, ७ फेब्रुवारी) सुनावणीसाठी येणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर याचिका दाखल झाली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस काढली आहे. ते त्यांचे म्हणणे बुधवारी मांडणार आहेत. छाजेड आणि अय्यर यांच्या वतीने अ‍ॅड. अभय अंतुरकर, अ‍ॅड. सूरभी कपूर आणि अ‍ॅड. असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.

हेही वाचा >>>परवाना हवाय…प्रतीक्षा करा! आरटीओच्या ऑनलाइन सेवेला ‘एनआयसी’चा खो

निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’ मशीनमधून चिठ्ठी येते, त्यावर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी, अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. २०१९ च्या निवडणुकीत चिठ्ठीवर वेळ आणि तारीख छापली नव्हती. निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाची तारीख, वेळेसह चिठ्ठी छापून मिळावी, अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर वेळोवेळी अंमलबजावणी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखत तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A congress officebearer petition demands that the polling date be required on the vvpat ticket amy
Show comments