scorecardresearch

“आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन,” पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

तरुणाने राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं

“आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन,” पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पती पत्नीच्या भांडणात दिराने हार्पिक पाजल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला काही तास होत नाही तोवर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून सासरच्या मंडळींवर कारवाई करावी, अशी सुसाईड नोट सापडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि सोनाली यांच एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. दोघांचा संसार ठीकठाक सुरू होता. सोनाली नऊ महिन्यांची गर्भवती असताना बाळंतपणासाठी कोणत्या रूग्णालयात नाव नोंद करायचे यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचदरम्यान सोनाली यांचा दीर विकास आणि लक्ष्मी या दोघांनी पकडून हार्पिक क्लिनर पाजले. यानंतर तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पती निखिल धोत्रे, विकास धोत्रे आणि लक्ष्मी धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास निखिल त्याच्या बेडरुममध्ये एकटाच होता. बराच वेळ झाला तरी तो रूमच्या बाहेर न आल्याने त्याच्या भावाने दरवाजा वाजवला. यावेळी आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडून रूममध्ये गेल्यावर, निखिल याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

निखिल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये निखिल याने असे म्हटले आहे की, आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे त्यात म्हटले आहे. आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’, असे लिहिले आहे. तर या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या