नाटय़गृहामध्ये असलेल्या असुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तारखांवर खासगी कार्यक्रमांचे होणारे अतिक्रमण या गैरसोयींकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाटय़निर्माते-नाटय़व्यवस्थापक संघ आणि रंगकर्मीनी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मंगळवारी आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे सुपूर्द करण्याचे आश्वासन रंगमंदिराचे व्यवस्थापक भारत कुमावत यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
नाटय़गृहातील गैरसोयींबाबत महापालिका प्रशासनाशी आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडली. नाटय़निर्माता संघाच्या अध्यक्षा भाग्यक्षी देसाई, लावणीनिर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, ज्योती चांदेकर, अरुणा भट, रजनी भट, नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील महाजन, समीर हंपी, पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, भालचंद्र पानसे, मोहन कुलकर्णी, शशिकांत कोठावळे, शिरीष रायरीकर, प्रवीण बर्वे, शिवानी भाटे, शिरीष कुलकर्णी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
शनिवार-रविवार आणि गुरुवारच्या तारखा सांस्कृतिक कार्यक्रमांना देण्याच्या नियमाचे पालन केले जात नाही, असे सांगून भाग्यश्री देसाई यांनी चौमाही वाटपातील ९३ पैकी ७३ तारखा खासगी कार्यक्रमांना देण्यात आल्या आहेत याकडे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच्या तारीख वाटपाचे धोरण निश्चित करून महापालिकेने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सुरेश देशमुख यांनी केली. सुविधांसाठी रंगकर्मीना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी असल्याचे सांगून सुनील महाजन म्हणाले, महापालिकेने उभारलेली नवी नाटय़गृहे अयोग्य असून कलाकारांच्या गरजांचा विचार करण्यात आलेला नाही. रंगमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांना डावलले जाते.
रंगकर्मीच्या मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करणार असल्याचे भारत कुमावत यांनी सांगितले. रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम दीड महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.