काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना अटक होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी बुधवारी सांगितले. कदम यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसने गुंडांबद्दल बोलू नये, त्यांच्याकडे गुंडांचीच भरती आहे. माझ्यावर आरोप करून आता मूळ मुद्दय़ाला बगल दिली जात आहे. मात्र, पुणेकर पैसे वाटणाऱ्या भ्रष्ट संस्कृतीला कात्रजचा घाट दाखवतील, असेही ते म्हणाले.
रास्ता पेठेमध्ये मंगळवारी मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठाच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपप्राचार्यासह तिघांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी विश्वजित कदम यांना अटक करण्याची मागणी करून पायगुडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
पायगुडे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना तिघांना पकडले. आणखी दहा ते बारा जण सुमारे १६ लाख रुपयांच्या रकमेसह पळून गेले. पकडलेले लोक हे रास्ता पेठेतील हॉटेलात बसत होते. त्यांच्याकडे मतदारांची कुटुंबनिहाय माहिती सापडली. मतदानाच्या स्लिपा, हॉटेलची बिले या सर्वाचे व्हिडीओ शूटिंग आहे. त्यामुळे हा स्टंट कसा होऊ शकतो? निवडणुकीच्या दृष्टीने सध्याची वेळ मला महत्त्वाची आहे. परंतु, म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावता कामा नये, म्हणून पैसे वाटणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार कदम यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.