लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसविली आहे. मात्र, तीन महिने झाले तरी ही यंत्रणा अद्याप सुरु झाली नसून ती धूळखात पडून आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडल्याने शहराची गुणवत्ता ढासळत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील १७ चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली आहे. दर दहा मिनिटांनी या यंत्रणेद्वारे पाण्याचे तुषार उडविले जाणार आहेत. त्यामुळे हवेतील धुळीकण जड होऊन खाली बसतील. वर्दळीच्या चौकांत आकर्षक रचनेतील यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली ५०० ते एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या कामासाठी तीन कोटी ९० लाखांचा खर्च झाला आहे.

आणखी वाचा-पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोसरी, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे वस्ती, होळकर चौक, नेहरूनगर चौक, मोशी गोडाऊन चौक, चिंचवड येथे हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आकुर्डी खंडोबा चौक, नाशिक फाटा, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवडगाव चौक, रावेत-भोंडवे चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एमएए स्कूल चौक या चौकात ‘मिस्ट फाऊंटन’ बसविण्यात आले आहेत. त्याला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी, अद्याप ते सुरू झालेले नाहीत.

हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. चाचणी सुरू असून, ते लवकरच सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution control system has been in dust since three months pune print news ggy 03 mrj