अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे मुख्य आधारस्तंभ आणि विज्ञानवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनाने राज्याच्या पुरोगामी चळवळीचा चेहरा हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 
महाराष्ट्राला पुरोगामी चळवळींचा मोठा वारसा लाभला आहे. अलीकडच्या काळात या चळवळींना विज्ञानवादी दृष्टी आणि बळ देण्याचे कार्य दाभोलकर यांनी केले. महाराष्ट्रातील जनतेला अंधश्रद्धेच्या जोखडातून मूक्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. अंधश्रद्धेच्या विरोधात जनमत संघटित करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. त्यांची प्रबोधनात्मक लढाई `अंधश्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद` अशी होती. ही लढाईसोपी नव्हती; पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांच्या अंगी फार मोठा संयम होता. कटू प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्यही होते. वेगवेगळ्या विधायक आंदोलनांबरोबरच साहित्याच्या माध्यमातूनही त्यांनी आपली प्रबोधनाची लढाई पुढे नेण्याचे काम केले.
डॉ. दाभोलकर हे बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ आणि सामाजिक चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते होते. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव – एक विहीर’ चळवळीतील खंदा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आजही कायम आहे. साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचं संपादकपद गेली सात वर्षे भूषवताना त्यांनी या मासिकाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानवादी समाजाची निर्मिती या एकमेव ध्येयाने ते कार्य करीत होते. स्वत:च्या खिशाला चाट देऊन समाजकार्य करणाऱ्या मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा भ्याड कृत्यांनी विचारांची हत्या होऊ शकत नाही, असे अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.