पिंपरी पालिका शिक्षण मंडळाच्या बहुचर्चित निवडणुकीत गुरुवारी सभापतिपदी चेतन घुले यांची, तर उपसभापतिपदी नाना शिवले यांची बिनविरोध निवड झाली. बंडाच्या पावित्र्यातील आठ सदस्यांनी एकजूट दाखवून आधी स्वत: निर्णय घेतला व त्यावर ‘कारभारी’ अजित पवार यांना शिक्कामोर्तब करावे लागले. नवनियुक्त दोन्ही पदाधिकारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. निवडणूक झाल्यास बंडाळी होईल आणि राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागेल, या धास्तीतून जगताप समर्थक असूनही अजितदादांनी घुले व शिवले यांच्या नावावर नाईलाजाने शिक्कामोर्तब केले.
शिक्षण मंडळात राष्ट्रवादीचे दहा व काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. मात्र, भाजप-शिवसेनेचा एकही सदस्य नाही. पिंपरी पालिकेत अजितदादांचा शब्द अंतिम आहे. मात्र मंडळातील आठ सदस्यांनी परस्पर सामंजस्यातून एकजूट केली असून सलग दुसऱ्या वर्षी अजितदादांना आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले आहे. या आठपैकी दोन सदस्य माजी आमदार विलास लांडे यांचे तर चारजण लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. या सहा जणांना काँग्रेसच्या दोघांचे समर्थन आहे. गेल्या वेळी सभापतपिंदासाठी भालेकर व उपसभापतिपदासाठी काँग्रेसच्या आगरवाल यांची नावे ठरवण्यात आली. अन्य कोणाला संधी दिल्यास पराभव होईल म्हणून अजितदादांनी बदल केला नाही. या गटाने ठरवल्याप्रमाणे दुसऱ्यास संधी देण्यासाठी सहा महिन्यात भालेकर व आगरावालांनी राजीनामा दिला. नव्या सभापतपिंदासाठी राष्ट्रवादीकडून आझम पानसरे यांचे समर्थक शिरीष जाधव यांच्यासाठी यंदाही प्रचंड आग्रह होता. मात्र, या गटाने आपापसात घुले व शिवले यांची नावे ठरवली. हे दोघेही जगतापांचे समर्थक आहेत. मात्र, तरीही तीच नावे जाहीर करण्याचे आदेश अजितदादांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. पालिकेत बहुमत मिळाले, तेव्हा स्थानिक नेत्यांच्या शिफारशीवरून अजितदादांनी या सदस्यांची वर्णी लावली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीत आता अशी वेळ आली आहे की, हे सदस्य अजितदादांपेक्षा आपापल्या नेत्यांचेच आदेश मान्य करतात. त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे.