कातरवेळेला आळवल्या गेलेल्या ‘पूरिया कल्याण’च्या स्वरांनी कौशिकी चक्रवर्ती यांनी रंगविलेल्या मैफलीने ‘वसंतोत्सवा’च्या शनिवारच्या सत्रातील पूर्वार्धामध्ये रंग भरला. गायकी आणि तंतकारी अंगाच्या मिलाफातून बोलणाऱ्या नीलाद्री कुमार यांच्या सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या मैफलीतून पतियाळा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े उलगडत पूरिया कल्याण रागातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यांच्या आलापींना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना अजय जोगळेकर यांनी संवादिनीची, विजय घाटे यांनी तबल्याची तर, ईशानी कोतवाल आणि मैत्रेयी साने यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली. अखेरीस एक ठुमरी सादर करीत कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाची सांगता झाली.
नीलाद्री कुमार यांचे सतारवादन आणि पं. अनिंदो चटर्जी यांची तबल्याची साथ अशी बहारदार मैफल रसिकांनी अनुभवली. वडील पं. कार्तिक कुमार यांच्याकडून सतारवादनाची तालीम घेतलेल्या नीलाद्री कुमार यांनी ‘बागेश्री’ रागाचा आलाप, जोड आणि झाला सादर केला. पं. अनिंदो चटर्जी यांच्यासमवेत तबल्याच्या साथीने त्यांनी बागेश्री रागाच्या दोन गत सादर करताना गायकी आणि तंतकारी अंगाच्या सुंदर मिलाफाची अनुभूती श्रोत्यांना दिली.