पुण्यातील मतदानाची टक्केवारी लक्षणीय प्रमाणात वाढवण्यात यावेळी राजकीय पक्ष व प्रशासनाला यश आले. वाढलेल्या टक्केवारीचा अर्थ लावण्याचे काम आता राजकीय पक्षांचे पदाधिकारी करत आहेत. भाजप-शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील टक्केवारी इतर तीन विधानसभा मतदारसंघांपेक्षा आठ ते दहा टक्क्यांनी अधिक असल्यामुळे महायुतीमध्ये आकडेवारीमुळे समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात ४०.६६ टक्के मतदान झाले होते. ते यंदा ५४.२४ टक्के इतके झाले. पुण्यातील कसबा, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीचे आमदार आहेत. तर शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरीत काँग्रेस आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी तीन मतदारसंघांवर महायुतीची आणि तीन मतदारसंघांवर आघाडीची मोठी भिस्त होती. मतदानाची अंतिम शासकीय आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कसब्यातून सलग चार वेळा भाजपचे गिरीश बापट विधानसभेवर निवडून जात आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक ६२ टक्के मतदान झाले आहे. पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ आमदार असून तेथे ५४ टक्के मतदान झाले आहे, तर कोथरूड या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ५५ टक्के मतदान झाले आहे. तेथे चंद्रकांत मोकाटे आमदार आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे बापू पठारे आमदार असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात ४९ टक्के मतदान झाले. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचे विनायक निम्हण आमदार असून तेथे ५३ टक्के, तर रमेश बागवे आमदार असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले आहे.
कसबा मतदारसंघात सरासरी ६२ टक्क्य़ांवर मतदान झाले असले, तरी भाजपचे नगरसेवक असलेल्या काही प्रभागांमध्ये मात्र हेच प्रमाण ६६ ते ७० टक्के इतके आहे आणि काही बूथवर ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे. आमचे नगरसेवक असलेल्या बहुतेक सर्व प्रभागांमध्ये चांगले मतदान करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो, असे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. काँग्रेसला ज्या तीन मतदारसंघात मोठय़ा मताधिक्याची अपेक्षा होती, तेथे साठ टक्क्यांच्यावर मतदान करून घेणे हे काँग्रेस आघाडीचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यांचे मतदान ४९ ते ५३ टक्के या दरम्यानच राहिले आहे.
 
बास झाले, हे म्हणण्याचा क्षण दिसला..
राजकीय व्यवस्थेवर लोकांचा भयंकर राग आहे. लोक त्या व्यवस्थेबद्दल असमाधानी आहेत. भ्रष्टाचार, निवडणुकीतील पैसे वाटप हे सारे कुठेतरी थांबले पाहिजे, ही लोकांची भावना आहे. आता तुमचे हे सगळे बास झाले, हे सर्वानी एकत्रितरीत्या म्हणण्याचा क्षण किंवा चळवळ अगदी जवळ आल्यासारखी परिस्थिती दिसत आहे आणि तो क्षण मतदानातून पुण्यात दिसला. जे पहिल्यांदाच मतदार झाले आहेत ते तरुणही यावेळी मोठय़ा संख्येने मतदान प्रक्रियेत होते. माध्यमांनी आणि सोशल मिडियानेही मोठी जागृती केली त्यामुळेही मतदानाची टक्केवारी वाढली आहे. महिलांमधील जागृती देखील लक्षणीय आहे. मोदींची आणि आम आदमी पक्षाकडूनही केजरीवाल यांची छबी ज्या पद्धतीने मांडण्यात आली, त्यातून दोन्ही बाजूच्या भूमिकांमध्ये एक हिरीरी दिसत आहे. त्यातूनही मतदान वाढले आहे.
– प्रा. यशवंत सुमंत
(समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक)

Sharad Pawar, Chopda,
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर, चोपड्यातील सभेत शरद पवार यांची टीका
Show Cause Notice, Youth Congress,
युवक काँग्रेसमध्ये कारणे दाखवा नोटीसमुळे वादळ, कुणाल राऊत लक्ष्य
Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे